कोल्हापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथील २३ जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे १९० बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून यंदापासून प्रथमच आॅनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.आषाढी यात्रेला राज्यभरातून भाविक येत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांना सुरक्षितरीत्या प्रवास घडवून आणण्यासाठी कोल्हापूर विभागातर्फे १९ ते २४ जुलै या यात्रा काळामध्ये एस.टी. चे कर्मचारी अहोरात्र सेवा देणार आहेत.यात्रेला जाणारे व परतीच्या प्रवासाची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून जादा बसेसपैकी सुमारे १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यासाठी त्यांच्यासह सर्व प्रवाशांनी एस.टी. महामंडळाच्या www.msrtc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून आॅनलाईन आरक्षण उपलब्ध करून दिले आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागातर्फे १७१ जादा एस.टी. गाड्या पंढरपूर यात्राकाळात सोडण्यात आल्या होत्या, त्यांच्या जवळपास ८५० फेऱ्या झाल्या होत्या.
यात्रेवेळी स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांना गर्दीमुळे बसेसमध्ये चढताही येत नाही. काही वेळा त्यांना शेवटची आसने मिळतात. अशावेळी त्यांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांचे आसन निश्चित होऊन प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. यासह महामंडळाच्यावतीने ग्रुप बुकिंगची व्यवस्था केली आहे.रोहन पलंगे, विभाग नियंत्रक
भाडेवाढीचा फटका वारीला....गेल्या महिन्यापासून महामंडळाच्या सर्व प्रकारच्या सेवा प्रकारांच्या भाड्यांमध्ये १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम, पंढरपूरच्या आषाढी वारीवर होणार आहे. पूर्वी एका व्यक्तीला कोल्हापूर ते पंढरपूरला जाण्यासाठी १९० रुपये तिकीट दर होता; परंतु नुकत्याच झालेल्या भाडेवाढीमुळे आता एका प्रवाशाला २२५ रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रवाशाला पूर्वीपेक्षा यंदा ३५ रुपये अधिक मोजावे लागणार आहे.