कोल्हापूर : ‘सारी’च्या आजाराने कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला बळी गेला असून या आजारामुळे इचलकरंजी येथील गणेशनगरमधील ४५ वर्षांच्या व्यक्तीचा बुधवारी पहाटे सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. मराठवाडा परिसरात सुरू असलेल्या या साथीची लागण कोल्हापूर जिल्ह्यातही झाली असल्याने अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.
तीव्र ताप, तीव्र सर्दी, तीव्र खोकला आणि मोठ्या प्रमाणावर श्वसनाचा त्रास अशी ‘सारी’ची लक्षणे आहेत. या आजाराने त्रस्त असलेल्या या व्यक्तीला मंगळवारी रात्री आठ वाजता ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले होते. सर्व ते उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रक्तदाबाचाही त्रास होता. त्याच्या घशातील स्राव घेण्यात आला आहे. राधानगरी तालुक्यातील एकालाही सारीची लागण झाली आहे.
हातकणंगले तालुक्यातील दुर्गेवाडी, कुंभोज येथील २७ वर्षीय महिलेचा छातीच्या उजव्या बाजूमध्ये संसर्ग झाल्यामुळे आणि ते रक्तात मिसळल्यामुळे आलेल्या झटक्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना मंगळवारी (दि. २८) रात्री साडेअकरा वाजता ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचाही बुधवारी पहाटे पावणे पाच वाजता मृत्यू झाला. त्यांचाही घशातील स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.