कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेला आहे. स्वाइन फ्लू झालेल्या पोलीस नाईक विजय जयराम लोकरे (वय ३६, रा. कलमठ-बाजारपेठ) यांचे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले.विजय लोकरे यांना ५ आॅक्टोबरपासून ताप येत होता. खासगी दवाखान्यात प्रथम त्यांनी उपचार घेतले. १० आॅक्टोबरला त्यांना चक्कर आल्याने तसेच श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते.
ताप कमी न झाल्याने त्यांना ११ आॅक्टोबरला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे १४ आॅक्टोबरला पुन्हा चाचणी केल्यावर स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. गेले आठ दिवस त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांची रविवारी सायंकाळी प्राणज्योत मालवली.सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यरत असलेले विजय लोकरे बाळा या टोपण नावाने सर्वांना सुपरिचित होते. त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या पश्चात पत्नी विद्या, मुलगे नील व प्रथम असा परिवार आहे. विजय लोकरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच कलमठ गावात शोककळा पसरली.दरम्यान, स्वाइन फ्लूमुळे रुग्ण दगावल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यापूर्वी कलमठ गावात स्वाइन फ्लूबाबत सर्व्हेदेखील करण्यात आला होता. मात्र, आणखीन कोणी रुग्ण आढळून आला नव्हता. या घटनेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.