उदगांव : शिरोळ तालुक्याची मुख्य जलवाहिनी असलेल्या कृष्णा नदीत गुरुवारी रात्री मळीमिश्रित पाणी सोडल्याने शुक्रवारी सकाळी कृष्णा नदीकाठावर हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीकाठावरील गावांना आता दूषित पाण्याचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी उदगाव ग्रामपंचायत व ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, ‘आंदोलन अंकुश’चे राकेश जगदाळे, अमर शिंदे, अविनाश पाटील, अक्षय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. शिवाय उदगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नदीकाठाची पाहणी करून प्रदूषण विभागाला लेखी निवेदन दिले. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री केदार, उपसरपंच शिवाजी कोळी, प्रकाश बंडगर, प्रेमनिहाल रांजणे, विजय कोळी, शुभम गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)माशांचा : खच१ सांगली-कोल्हापूर महामार्गावर असणाऱ्या कृष्णा नदीपात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याने नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे. २ नदीतील पाणी हिरवेगार बनले असून, हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथळी, उमळवाड, उदगाव, चिंचवाड परिसराच्या नदीकाठावर माशांचा मोठ्या प्रमाणात खच पडला होता. ३ सामाजिक कार्यकर्ते शीतल आंबी व सागर कदम यांनी प्रदूषण विभागाशी संपर्क साधल्यानंतर याठिकाणी प्रदूषण मंडळाच्या पथकाने पाहणी केली.
‘कृष्णे’त मासे मृत्युमुखी
By admin | Published: April 14, 2017 11:44 PM