कोल्हापूर : परिते ( ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणी केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील पाच जणांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार राणी कांबळे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) ही फरार आहे. या प्रकरणात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
घर मालक साताप्पा कृष्णा खाडे ( वय ४२, रा. परिते, ता. करवीर), गर्भलिंग निदानासाठी आणलेल्या महिलेचा पती अनिल भीमराव माळी ( ३६) एजंट भारत सुकूमार जाधव ( ३६, रा दोघेही : हूपरी, ता. हातकणंगले), एजंट सचिन दत्तात्रय घाटगे ( ४२, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी), बनावट डॉक्टर महेश सुबराव पाटील ( ३०, रा. सिरसे, ता. राधानगरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजमाता यशवंत माळी ( ६३, रा. हूपरी, ता. हातकणंगले) या वयोवृध्द असल्याने नोटीस देण्यात आली आहे.परिते येथील साताप्पा खाडे यांच्या घरामध्ये अवैधरित्या गर्भलिंग तपासणी केंद्र असल्याची माहिती शहर पोलीस उप अधीक्षक चव्हाण यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथक पाठवून रविवारी खाडे यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी गर्भलिंग तपासणी होत असल्याचे समोर आले.
दरम्यान, पोलीस आल्याची चाहूल लागताच गर्भलिंग तपासणी केंद्र चालवणारी राणी कांबळे फरार झाली. मात्र पोलिसांनी तिचा सहकारी बनावट डॉक्टर महेश पाटील, एजंट सचिन घाटगे, भारत जाधव, घर मालक सातापा खाडे, अनिल माळी या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३० हजार १०० रुपयांची रोकड, एक सोनोग्राफी मशीन, औषधे व इंजेक्शन असा सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
करवीरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुवर्णा पाटील, इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी योगिता अग्रवाल, खूपिरे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सरिता थोरात, परिते आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मीरा भांगरे, आरोग्य सेवक जालिंदर काताडे, अॅड. गौरी पाटील यांच्या पोलीस पथकाने कारवाईमध्ये सहभाग घेतला.
परितेमधील गर्भलिंग तपासणी प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई होईल. या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचे काम सुरू आहे.-शैलेश बलकवडे,जिल्हा पोलीस अधीक्षक