कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, आजरा तालुक्यांसह धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी १७ फुटांपर्यंत पोहोचली असून, पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी कोल्हापूर शहरात दिवसभर उघडझापच राहिली. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला, तर हातकणंगले, शिरोळ तालुक्यात फार कमी नोंद पावसाची झाली.
धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणातून प्रतिसेंकद ११०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगा नदीची पातळी १७ फुटांवर गेली आहे. पाच बंधारे पाण्याखाली गेले असून, राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने वडणगे मार्ग, तर गगनबावडा ते गगनगिरी मार्गावरील मोरी वाहून गेल्याने रस्ते बंद आहेत.गवसे सर्कलमध्ये १४२ मिलिमीटर पाऊससोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १९.५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्कलनिहाय पाऊस बघायचे झाल्यास गवसे सर्कलमध्ये १४२, तर राधानगरी सर्कलमध्ये ७४ मिलिमीटर पाऊस झाला.