पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामपंचायतीने आजपासून ५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. रुग्णांची संख्या वाढत असतानाही ग्रामस्थांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला जात असल्याने ग्रामपंचायतीने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत गावामध्ये ४४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पट्टणकोडोली गावामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र, ग्रामस्थांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले सर्व निर्बंध पाळण्यात कुचराई होत आहे. विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बाजारात, किराणा दुकानात सोशल डिस्टन्ससिंग पाळण्यात येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने आजपासून मंगळवारपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्याचे जाहीर केले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवसाय बंद राहतील. विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असून दुकाने उघडणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, तर पाच दिवसांच्या लॉकडाऊननंतर व्यावसायिकांनी अँटिजन चाचणी करूनच दुकाने उघडावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.