कोल्हापूर : अतिवृष्टीने निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर झाल्याने पाच दिवसांनी कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस शुक्रवारी कोल्हापूरमधून धावल्या. त्यातून तिकीट आरक्षित केलेल्या ७५ जणांनी प्रवास केला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे मार्चपासून रेल्वे सेवा बंद होती. ही सेवा गेल्या आठवड्यामध्ये सुरू झाली. लॉकडाऊननंतर कोल्हापूरमधील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून दि. १२ ऑक्टोबरला कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस पहिल्यांदा धावली. त्यातून कोल्हापूर, सांगली आणि मिरजमधील एकूण ३०२ जणांनी प्रवास केला होता.|त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने भिलवडी-नांद्रे रेल्वे मार्गावर तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे कोल्हापूर येणाऱ्या संबंधित दोन्ही रेल्वे पाच दिवसांसाठी रद्द झाल्या होत्या. त्या शुक्रवारी पूर्ववत सुरू झाल्या. कोल्हापूर- मुंबई मार्गावर धावणारी कोयना एक्स्प्रेस सकाळी आठ वाजून पाच मिनिटांच्या सुमारास निघाली. त्यात ६० प्रवासी होते.
कोल्हापूर ते गोंदिया मार्गावरील महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूरमधून निघाली. त्यात १५ प्रवासी होते. कोल्हापूर-मुंबई मार्गावरील महालक्ष्मी एक्सप्रेस लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत असल्याचे पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले.