कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना एकसंध आहे, हे दाखवण्यापुरतेच गुरुवारी पाच संचालक एकत्र बसले. तासाभरानंतर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार निवेदिता माने या सत्तारुढ गटात जाऊन बसल्या.सत्तारुढ गटातून शिवसेनेचे दोन तर विरोधी आघाडीतून तीन संचालक निवडून आले होते. पाचजण एकत्र रहा, असा निरोप बुधवारी पक्षाच्या वरिष्ठांकडून आला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्जुन आबीटकर हे शासकीय विश्रामगृहात दाखल झाले, त्यानंतर राज्यमंत्री पाटील-यड्रावकर व निवेदिता माने तिथे आल्या.पाचजण एकत्र बसले, यावेळी नेत्यांमध्ये थोडी खडाजंगी झाली. थोड्या वेळाने पाटील-यड्रावकर हे आपल्या कक्षात उठून गेल्यानंतर माने पण तिथे गेल्या. तेथून दोघेही सत्तारुढ आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले.शिवसेनेचा उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव- बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर किंवा अर्जुन आबीटकर यांना उपाध्यक्षपद द्यावे, असा प्रस्ताव घेऊन राज्यमंत्री पाटील-यड्रावकर हे सत्तारुढ आघाडीसोबत चर्चेला गेले.
- मात्र त्याची चर्चाही झाली नाही. मात्र याबाबत मंडलीक यांना विचारले असता, उपाध्यक्षपदाची मागणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाच वर्षे मुश्रीफच अध्यक्ष
मागील सहा वर्षे हसन मुश्रीफ अध्यक्ष राहिले. आता पुढील पाच वर्षे तेच अध्यक्षपदी कायम राहतील, असे स्पष्ट संकेत नेत्यांनी निवडीवेळी दिले.
अध्यक्षपदाच्या बैठकीत ‘डीपीडीसी’ची चर्चा
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची नावे निश्चित झाल्यानंतर सतेज पाटील हे संजय मंडलिक यांना भेटण्यासाठी गेले. याबाबत विचारले असता ‘डीपीडीसी’च्या निधी वाटपाबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे पाटील यांनी सांगितले.