माद्याळ येथील रांगी नावाच्या शेतात दोन हत्तींनी आठ दिवसांपासून तळ ठोकला आहे. एकाच वेळी हे दोन हत्ती पिकामधून पाठोपाठ फिरत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भात रोप लागण फस्त केली आहे. तर उसाचे मोठे नुकसान करण्यात आले आहे.
यामध्ये शिवाजी शेळके, सुरेश शेळके, मनोहर बोलके, महादेव शेळके, हणमंत शेळके, तुकाराम बोलके, विठोबा बोलके आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बारा महिने हत्तीकडून नुकसान होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. मिळणारे नुकसानही तुटपुंजे असल्याने पश्चिम भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान नव्याने कोकणामधून तीन हत्तींनी प्रवेश केल्याच्या वृत्तामुळे पश्चिम भागातील शेतकरी भयभीत झाला असून शासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
चौकट :
शासनाने शेती ताब्यात घ्यावी
दरवर्षी ५० ते ६० टनाचे नुकसान होत आहे. गेल्या दहा वर्षात माझ्या कुटुंबाचे २० लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेती ताब्यात घेऊन दरवर्षी २ लाख रुपये उदरनिर्वाहासाठी देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी शिवाजी शेळके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.