संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद नोकर भरतीसाठी विविध ७२८ जागांसाठी पहिल्या टप्प्यात दि. ७, ८, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी तीन सत्रांत परीक्षा होत आहेत. आता फक्त ७ आणि ८ तारखेच्या पेपरसाठीचेच प्रवेशपत्र कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरुन डाउनलोड करता येणार आहे. जिल्ह्यात एकुण ५ परिक्षा केंद्रे असून परिक्षा हॉलमध्ये जॅमर लावले असतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील ७२८ रिक्त जागांसाठी परीक्षा होत असून यासाठी आयबीपीएस या त्रयस्थ कंपनीबरोबर करार झाला आहे. जिल्ह्यात एकुण ३५,९०८ अर्ज आले असून एकुण ५ परिक्षा केंद्रांवर २५४१ उमेदवार पहिल्या टप्प्यात परीक्षा देणार आहेत. यातील ५५ दिव्यांग व्यक्ती आहेत. पहिल्या टप्प्यात फक्त दि. ७ आणि ८ या तारखांचेच प्रवेशपत्र डाउनलोड होत असून सबंधितांना एसएमएसद्वारे सूचनाही दिल्या आहेत. संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचनांची पुस्तिकाही उपलब्ध असून. उमेदवारांसाठी जिल्हा परिषदेने ०२३१-२६५५४१६ या क्रमांकावर मदतकक्ष सुरु केलेला आहे.
प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका
उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा देताना त्याचा स्वतंत्र पासवर्ड असणार आहे. प्रत्येक उमेदवाराची त्याच्या संगणकावरच इन्क्रिप्टेड फाॅर्ममध्येच प्रश्नपत्रिका मिळणार असून ती लॅनद्वारे कनेक्ट होणार आहे. त्या उमेदवाराशिवाय ती इतरत्र उघडणार नाही. प्रत्येक प्रश्नपत्रिका १२० मिनिटांची असणार आहे.