-गणेश शिंदे ।
कोल्हापूर : तपासणीसाठी अतिरिक्त पैसे घेणे, परवडणारे पॅकेज न करणे, रुग्णाला दोन-चार दिवस जादा अॅडमिट करून घेणे, अशा आॅनलाईन तक्रारी दाखल झाल्याने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेली कोल्हापूर शहरातील पाच रुग्णालये ‘हिटलिस्ट’वर आली आहेत. याची गंभीर दखल घेऊन जिल्हा समन्वयक यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविल्यामुळे या रुग्णालयांवर कारवाई अटळ असल्याचे मानले जाते. यापूर्वी या योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील दोन रुग्णालयांना त्यांच्या त्रुटींमुळे बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता.
गरिबांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांत, तर दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांत २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना सुरू झाली. सध्या ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ असे या योजनेचे नाव आहे. योजनेत जिल्ह्यातील ३२ रुग्णालयांचा समाविष्ट आहे. इचलकरंजी, गडहिंग्लज, नेसरी यांसह शहरातील रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये ९७१ आजारांचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत २८ आॅनलाईन तक्रारी या योजनेचे जिल्हा समन्वयक यांच्याकडे दाखल झाल्या आहेत. एक्स-रे, सी.टी. स्कॅन, सोनोग्राफी, रक्ततपासणी, स्टेन्स बदलणे यांसह अतिरिक्त पैसे घेणे, परवडणारे पॅकेज न करणे (उदा. हृदयरोग, मूत्ररोग), रुग्णाला जादा दोन-चार दिवस दाखल करून घेणे असे तक्रारींचे स्वरूप आहे. त्याचबरोबर या रुग्णालयांवर कारवाई करा, अशीही मागणी लोकप्रतिनिधींकडे होत आहे.
राज्यात कोल्हापूर जिल्हा दुसºया क्रमांकावरकोल्हापूर जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ ते ३० सप्टेंबर २०१८ अखेर (चार वर्षे दहा महिने) या योजनेतील रुग्णालयांना ३०५ कोटी ९३ लाख ३० हजार १३९ रुपयांचा परतावा मिळाला आहे; तर एक लाख २१ हजार १०८ शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांपैकी गेल्या नऊ महिन्यांत ६५कोटी ८२ लाख ४८४ रुपयांचा परतावा मिळाला आहे; तर २७ हजार ४२६ शस्त्रक्रिया झाल्या. कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड (किडनी विकार) या आजारांच्या सर्र्वाधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या योजनेत राज्यामध्ये कोल्हापूरचा दुसरा क्रमांक लागतो.
आरोग्य शिबिरालाही हरताळया योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनी महिन्याला दोन आरोग्य शिबिरे घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी रुग्णालयांना या शिबिरासाठी पाच-पाच हजार असे एकूण दहा हजार रुपये दिले जातात. या शिबिरांमधून योजनेचा जनजागृती करण्याचा शासनाचा उद्देश आहे; पण काही रुग्णालये आरोग्य शिबिरे घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाई होणार आहे.
रुग्णालयाबाबत काही तक्रारी असल्यास रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा अथवा ‘सीपीआर’मधील योजनेच्या कार्यालयात भेटावे. त्यांच्या लेखी तक्रारीची दखल घेतली जाईल.
डॉ. सागर पाटील, जिल्हा समन्वयक,महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना.