कोल्हापूर : शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद-सुरू करून बँकेच्या वेगवेगळ्या नऊ खात्यांवरून चोरट्यांनी सुमारे ५ लाख १० हजार रुपये काढून परस्पर लंपास केल्याचे उघडकीस आले. दि. २१ जून ते ७ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला आहे.अधिक माहिती अशी, बसंत बहार रोड परिसरात स्टेट बँक आॅफ इंडियाची ट्रेझरी शाखा आहे. तिच्याशेजारी बँकेची दोन एटीएम व एक पैसे भरण्याचे मशीन आहे. त्यांपैकी एका एटीएम मशीनचा विद्युत पुरवठा नियंत्रित करणारा पॉवर स्विच चोरट्याने उचकटून मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून वेळोवेळी त्यातील सुमारे पाच लाख दहा हजार रुपये काढून घेतले.
एटीएम मशीनच्या संगणकीय कार्यप्रणालीमध्ये बिघाड करून, तांत्रिक अडथळे निर्माण करून वेगवेगळ्या नऊ एटीएम कार्डवरून बँकेची ५ लाख १० हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
चोरट्यांनी एटीएम मशीनच्या संगणकीय कार्यप्रणालीच्या सुव्यवस्थेत स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता तांत्रिक अडथळे निर्माण करून बँकेची १६ वेळेस आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.
याप्रकरणी बँकेचे मुख्य प्रबंधक जगदीश संतेबछली चिकबसाप्पा (वय ४६, रा. जयनगर, बंगलोर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्यांचा माग काढत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.एटीएम सेंटर असुरक्षितजिल्ह्यात विविध बँकांची एटीएम सेंटर आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही असल्याने सुरक्षारक्षक नाहीत; त्यामुळे संगणक तज्ज्ञ असणाऱ्या चोरट्यांनी आता एटीएम सेंटर लक्ष्य केली आहेत. एटीएमचा पॉवर सप्लाय बंद-सुरू करून त्यावरून पैसे काढून बँकेची फसवणूक करण्याचा पहिलाच प्रकार घडल्याने बँक प्रशासनासह पोलीस चक्रावून गेले आहेत. जिल्ह्यातील एटीएम सेंटर असुरक्षित असल्याचे यातून दिसून येत आहे.