समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पावणेपाच लाख अतिक्रमणे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ झालेली अतिक्रमणे नियमित करण्याचा पहिला टप्पा म्हणून राज्यभरातून माहिती संकलित करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४७ हजार ४७९ अतिक्रमणे असून, सर्वांत कमी अतिक्रमणे रत्नागिरी जिल्ह्यात ८०१ आहेत.दोन महिन्यांपूर्वी शासनाने याबाबत निर्णय घेऊन अशी अतिक्रमणे नियमित करण्यासाठीचा शासन आदेश काढला होता. त्यानंतर गेले दोन महिने स्थळपाहणी करून याबाबतची आकडेवारी भरण्याचे आदेश देण्यात आलेहोते.अतिक्रमण किती जागेवर केले आहे, तेथे वास्तव्यास कोण आहे, आधार क्रमांक, गायरान, गावठाण, गावठाणाबाहेर, सार्वजनिक वापरातील जागा, प्रशासकीय जमीन आहे का, अतिक्रमण केल्याचे वर्ष, एकूण अतिक्रमणापैकी निवासी वापरासाठी नेमका किती वापर आहे, व्यावसायिक कारणासाठी किती वापर केला आहे, अतिक्रमित कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये घर आहे किंवा नाही, अशी सर्व माहिती स्थळ पाहणीच्या वेळी भरून घेण्यात आली आहे.सोलापूर पाठोपाठ सर्वाधिक अतिक्रमणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात असून, तिसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. बुलढाणा, नाशिक आणि कोल्हापूर अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकांवर आहेत.केवळ निवासासाठीचे अतिक्रमण नियमित !अनेकांनी सार्वजनिक जागांमध्ये शेती करण्यापासून ते उद्योग उभारणीपर्यंतचे अतिक्रमण केले आहे. मात्र, या योजनाच केवळ निवासासाठीचे अतिक्रमण नियमित करण्याबाबत असल्याने अन्य अतिक्रमणे काढून टाकणार आहेत.अतिक्रमणांची जिल्हावार संख्यासोलापूर- ४७४७९ ,नागपूर- ४२७६८,पुणे- ३५०१०, बुलढाणा- ३४१३५, नाशिक-२५४३४, कोल्हापूर-२४३६०, भंडारा-१९८५३, वाशिम-१९०८०, लातूर- १८३५९, धुळे-१८००८, जालना-१७२१९, बीड-१६१४४, औरंगाबाद-१५६०५, जळगाव-१५१६५, सातारा-१३५५५, यवतमाळ-१२७३३, हिंगोली-१२५६७, चंद्रपूर-१२४१७, अहमदनगर-१०१६१, सांगली-९३६७,वर्धा-९१४४, उस्मानाबाद-७५३८, परभणी-५५५६, नांदेड-५५२५, नंदूरबार-४८९७, अकोला-३६६८, अमरावती-३५०२, ठाणे- ३२८७, पालघर-३२१५, रायगड २२६८, गोंदिया-२०९३, गडचिरोली-१५०४, सिंधुदुर्ग-८३०, रत्नागिरी-८०१
ग्रामीण महाराष्ट्रात पाच लाख अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:27 PM