कोल्हापूर : महापौर माळवी यांना गुरुवारी राज्य शासनाच्या आदेशाने पायउतार व्हावे लागले. प्रशासनाने महापौरांच्या सर्व सेवा तत्काळ खंडित केल्या. महापालिकेत गेली पाच महिने महापौर लाचखोर प्रकरण केंद्रस्थानी होते. मात्र, या निर्णयाविरोधात माळवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. त्यामुळेच शासनाच्या निर्णयाने यास ‘पूर्णविराम’ नव्हे, तर ‘स्वल्पविराम’ मिळाला आहे. अल्पकाळासाठी महापौरपद काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. इच्छुकांनी त्यासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी माजी मंत्री सतेज पाटील गटाच्या नगरसेविका मीना सूर्यवंशी या महापौरपदाच्या प्रमुख दावेदार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. अशी असेल महापौर निवडीची प्रक्रिया माळवी यांचे नगरसेवक व त्या अनुषंगाने महापौरपद रद्द झाल्याने नव्या महापौर निवडीसाठी कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती महापालिका प्रशासन विभागीय आयुक्तांना आज, शुक्रवारीच पत्राद्वारे करणार आहे. विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार पंधरा दिवसांत नव्या महापौर निवडीचे सोपस्कार पूर्ण होईल. उपमहापौर मोहन गोंजारे यांना प्रभारी म्हणून संधी मिळणार आहे.आघाडीत आनंदी आनंदतृप्ती माळवी शासन आदेशाने पायउतार झाल्याचे समजताच कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत आनंदाची लकेर उमटली. सत्ताधारी नगरसेवकांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता.तृप्ती माळवी पायउतार झाल्याने आता काँग्रेस आघाडीला महापौरपदासाठी संधी मिळणार आहे. इच्छुकांनी तत्काळ नेत्यांकडे पदासाठी गळ घालण्यास सुरुवात केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर लाचखोरीविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी महापौर माळवी यांच्या घडलेल्या लाचखोर प्रकरणात निर्णय घेणे त्यांच्यावर नैतिकदृष्ट्या बंधनकारकच होते आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला. हाच निर्णय यापूर्वीही घेणे सहज शक्य होते. मात्र, ‘देर आए, दुरुस्त आए’ अशा उक्तीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला; परंतु असो, उशिरा का असेना शासनाने निर्णय घेतला याचा आनंद आहे.- हसन मुश्रीफ, आमदारआता शहर व महापौरपदाची अब्रू गेली एवढे बस्स् झाले. तृप्ती माळवी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी आता न्यायालयीन डावपेच खेळण्यापेक्षा सभागृह व शहरातील नागरिकांच्या इच्छेचा मान राखून हा निर्णय मान्य करावा. - राजेश लाटकर, गटनेता, राष्ट्रवादीमहापौरपद रद्द करून राज्य शासनाने स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. हा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते. लवकरच महापौर निवडीची प्रक्रिया सुरू करावी, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. - शारंगधर देशमुख, गटनेता, कॉँग्रेससभागृहाची शान राखली जावी,यासाठी रस्त्यावरील लढ्यासह न्यायालयात लढा दिला. नगरविकास मंत्रालयाशी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर न्याय मिळाल्याचा विशेष आनंद होत आहे. - मोहन गोंजारे, उपमहापौर राज्य शासनाने जारी केलेला आदेश ई-मेलद्वारे सायंकाळी प्राप्त झाला. जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार महापौरांना पद रद्दबाबत लेखी सूचना केली आहे, तसेच त्यांच्या महापालिकेच्या सर्व सेवा तत्काळ काढून घेण्यात आल्या आहेत.- पी. शिवशंकर, आयुक्त
पाच महिन्यांच्या घडामोडींना ‘स्वल्पविराम’
By admin | Published: June 19, 2015 12:44 AM