कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग असणाऱ्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक निवडीचा मुहूर्त शिवाजी विद्यापीठ कधी साधणार, असा प्रश्न विद्यापीठाच्या घटकांतून उपस्थित होत आहे. अर्ज दाखल होऊन पाच महिने उलटले तरी अद्याप त्यांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून या पदाचे कामकाज प्रभारी पद्धतीने सुरू आहे.
या मंडळाच्या संचालकपदाचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने जुलैमध्ये महेश काकडे यांना विद्यापीठाने पदमुक्त केले. त्यासह या पदाचा प्रभारी कार्यभार परीक्षा मंडळातील उपकुलसचिव जी. आर. पळसे यांच्याकडे सोपविला. त्याआधी दोन दिवस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी, परीक्षा मंडळाच्या संचालकपदासाठी एकूण १६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्या छाननीची प्रक्रिया सुरू झाली. लोकसभा निवडणुकीमुळे अपुरे मनुष्यबळ असल्याने प्रक्रियेला विलंब झाला असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता चार महिने उलटले, तरी अद्याप संचालक निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या पहिल्या सत्रातील परीक्षा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्यांचा निकाल जाहीर करणे आणि आगामी दीक्षान्त समारंभ, ‘नॅक’चे होणारे मूल्यांकन, दुसºया सत्रातील परीक्षांचे नियोजन लक्षात घेता या मंडळाच्या संचालकांची निवड लवकर होणे आवश्यक आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून झालेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेण्यासाठी बुधवारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी तो घेतला नाही.अधिष्ठातांच्याही नियुक्त्या रखडल्यापरीक्षा मंडळाच्या संचालकपदासह मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान आणि अभियांत्रिकी, आंतरविद्याशाखा या चार अधिष्ठाता, क्रीडा अधिविभागाचे संचालक आाणि इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक नियुक्तीची प्रक्रिया विद्यापीठाने एकत्रितपणे सुरू केली आहे. आठसदस्यीय निवड समितीच्या माध्यमातून अधिष्ठाता आणि संबंधित संचालकपदांवरील नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मात्र, अद्याप ही प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अधिष्ठाता, संचालकांची नियुक्ती रखडली आहे.