कोल्हापूर : कोरोना संसर्ग हाेऊ नये म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दंड करणाऱ्या महापालिका प्रशासनातील अनेक कर्मचारी मास्क वापरत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली. सर्वांना मास्क लावण्याची नोटीस दिल्यानंतरही मास्क न वापरणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांंवर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दंडात्मक कारवाई केली.
कोरोनाची साथ संपलेली नाही, कमी झाली आहे. तसेच आता प्रतिबंधात्मक लसही बाजारात आली आहे. त्यामुळे नागरिकांतील कोरोनाची भीती कमी झाली आहे. अनेक नागरिक नाकाला मास्क लावत नाहीत. ही बाब निदर्शनास येताच प्रशासनाने मास्कची सक्ती केली आहे. रोज अनेक व्यक्तींना दंड केला जात आहे; परंतु ‘दुसऱ्यास सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण’ अशा भूमिकेत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांची ‘लोकमत’कडून पाहणी करण्यात आली. तेव्हा अनेक कर्मचारी अर्धवट मास्क लावत असल्याचे, तर काहीजण विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले होते. त्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची गांभीर्याने दखल घेतली.
कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा अशा प्रकारे नोटीस प्रशासनाने लागू केली होती. तरीही त्याकडे कानाडोळा होत होता. सोमवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना कार्यालयीन पाच कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तातडीने त्यांच्यावर संबंधित भरारी पथकाला दंडात्मक कारवाई करण्यास सांगितले. रणजित सणगत, शंकर वाडीया, सजन थनवाल, स्वप्निल माहुलकर, सुखदेव भोसले अशी कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे असून, त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला.
सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी यांना सर्वसामान्याप्रमाणेच नियम आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यामधून सूट दिली जाणार नसल्याचे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले. सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.