विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहापैकी पाच जागांवर अटीतटीच्या दुरंगी लढती होतील असे संभाव्य चित्र आजच्या घडीला स्पष्ट होताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा शिंदे सेना पदरात पाडून घेण्याची चिन्हे दिसत आहेत. याउलट राज्यात सर्वाधिक जागा लढवणाऱ्या भाजपच्या वाट्याला मात्र कशीबशी एकच जागा जाईल असे चित्र आहे. त्यांचा तसाही सध्या जिल्ह्यात एकही आमदार नसल्याने ही स्थिती भाजपवर ओढावली आहे.
लोकसभा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तत्त्वांना, राजकारणाला मुरुड घालून भाजपने सोबत घेतले. त्याचा फायदा तरी झाला नाहीच परंतु विधानसभेलाही हक्काच्या जागांवर त्यामुळे पाणी सोडावे लागत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या लग्नात नाचून आनंद घेण्याची पाळी कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत आमच्यावर येणार असल्याची भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.दुरंगी लढतीची चिन्हे ज्या मतदार संघात दिसत आहेत, तिथे जर-तरच्या घडामोडीही निर्णायक ठरणाऱ्या आहेत. कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजीवरील हक्क भाजप सहजासहजी सोडणार नाही. या जागा मिळाव्यात म्हणून शेवटपर्यंत भाजप ताकद पणाला लावू शकते. ही जागा शिंदेसेनेकडे गेल्यास भाजपचे सत्यजित कदम आणि इचलकरंजीची जागाही शिंदेसेनेकडे गेल्यास माजी आमदार सुरेश हाळवणकर कोणती भूमिका घेतात याला महत्व असेल. हाळवणकर यांचा पिंड पक्षाचा आदेश पाळण्याचा आहे. त्यामुळे ते जरूर नाराज होतील परंतु पक्षाच्या उलटे जावून काही करतील असे वाटत नाही. पक्षीय पाठबळ नसताना रिंगणात उतरणे सोपे नाही. त्यामुळे सत्यजित कदम यांच्यासमोरही पेच असेल. अशीच स्थिती राधानगरी मतदार संघात के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांची होणार आहे. ही जागा उद्धवसेनेकडे जाणार हे स्पष्टच आहे. तिथे उमेदवारी कुणाला मिळते आणि ज्याला मिळणार नाही तो काय करणार यावर निकाल अवलंबून असेल. आबिटकर यांना महायुतीत कोणतीच अडचण नाही, आघाडीत मात्र मेहुण्या-पाहुण्यातील संघर्ष पुन्हा उफाळणार आहे. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कांही तोडगा काढला तर लढत वेगळ्या वळणावर जाईल. कोल्हापूर दक्षिणमधून भाजपकडून अमल महाडिक यांचे नाव चर्चेत असले तरी आक्रमक चेहरा म्हणून शौमिका महाडिक यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध महाडिक ही लढत तिथे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष वेधून घेईल. कागलची लढत स्पष्टच झाली आहे. शाहूवाडीत आमदार विनय कोरे व सत्यजित पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा होईल. तिथे पन्हाळ्यात अजून कोण उठून बसतो का याचीच उत्सुकता असेल. चंदगडला मात्र सध्या तरी उमेदवारांची भाऊगर्दी झालेली दिसते.
हातकणंगले जनसुराज्यकडेच ..हातकणंगले काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे, जनसुराज्यशक्ती पक्षाचे अशोकराव माने व माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्यात लढत होईल अशी चिन्हे दिसत आहेत. या जागेसाठी कोरे यांचा दावा आहे. त्यामुळे ते सहजासहजी ही जागा शिंदेसेनेला देण्याची शक्यता नाही. लोकसभेला खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी कोरे यांनी लावलेली ताकद मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. त्यामुळे ते कोरे यांना दुखावून काय करतील असे वाटत नाही.
यड्रावकर यांच्या मनात वेगळेच..शिरोळमधून आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या मनांत वेगळेच आहे. तिथे ही जागा शिंदेसेनेला मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. परंतु ते थेट त्या पक्षाचे उमेदवार न होता अपक्ष लढतील अशा घडामोडी आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांच्या विजयांत दलित-मुस्लिम मतांचा वाटा मोठा होता. हे पाठबळ पुन्हा हवे असेल तर त्यांनी अपक्ष लढावे असा दबाव त्यांच्यावर आहे. गेल्या निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचा हात सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या मतांसाठी ताराराणी कडून पिवळा झेंडा हातात घेतला होता. माधवराव घाटगे यांना भाजपकडून विचारणा झाली असली तरी त्यांनी यापूर्वीच त्यास नकार दिला आहे. उबाठाकडे सध्यातरी उल्हास पाटील हाच पर्याय आहे.
इचलकरंजीत काय..इचलकरंजीत भाजप १९७८ पासून लढत आला आहे. दोनवेळा ही जागा भाजपने जिंकली आहे हे खरे असले तरी आता तिथे आवाडे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा त्यांनाच जाणार हे स्पष्टच आहे. भाजपांतर्गत उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठीच ही जागा शिंदेसेनेला द्यायचा पर्याय पुढे आल्याचे दिसते..तिथे आवाडे विरोधात महाविकास कडून मदन कारंडे अशा लढतीची चिन्हे दिसत आहेत.
या मतदार संघात दुरंगी लढतीची चिन्हेकोल्हापूर उत्तर : काँग्रेस विरुद्ध राजेश क्षीरसागरकोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील विरुद्ध शौमिका महाडिककागल : हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगेशाहूवाडी : विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटीलइचलकरंजी : राहुल आवाडे विरुद्ध मदन कारंडे
संभाव्य तिरंगी लढतीकरवीर : राहुल पाटील, चंद्रदीप नरके, संताजी घोरपडेराधानगरी : प्रकाश आबिटकर, के.पी.पाटील, ए.वाय.पाटीलहातकणंगले : राजूबाबा आवळे, अशोकराव माने, सुजित मिणचेकरशिरोळ : राजेंद्र पाटील यड्रावकर, उल्हास पाटील व ‘स्वाभिमानी’चा उमेदवार
चौरंगी लढतचंदगड : राजेश पाटील, नंदिनी बाभुळकर, शिवाजी पाटील, मानसिंग खोराटे
महायुतीतील संभाव्य जागावाटपशिंदेसेना -०५ : कोल्हापूर उत्तर,करवीर, राधानगरी, शिरोळ आणि इचलकरंजीराष्ट्रवादी अजित पवार पक्ष-०२ : कागल, चंदगडजनसुराज्य शक्ती-०२ : शाहूवाडी, हातकणंगलेभाजप-०१ : कोल्हापूर दक्षिण.
महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटपकाँग्रेस-०४ : कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर आणि हातकणंगले.उबाठा-०३ : राधानगरी, शिरोळ आणि शाहूवाडीराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष-०३ : कागल, चंदगड आणि इचलकरंजी