कोल्हापूर : मुस्लिम बोर्डिंग निवडणुकीच्या कारणावरून रविवार पेठेत झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाच जणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. कय्यूम उमर डांगे (वय २३, रा. जय शिवराय चौक, रविवार पेठ), कलाह अस्लम शेख (१९ , बिंदू चौक), युनूस हसन मुजावर (२८, रा. गंजी गल्ली, सोमवार पेठ), सुयम उमर डांगे (२२, रा. रविवार पेठ), असिफ दिलावर खान (२५, रा. सोमवार पेठ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून उर्वरित चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.
दरम्यान, याच कारणावरून शौकत बागवान याच्यासह पाच जणांवर राजारामपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २७) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद इम्रान युनूस मणेर (वय, २५ रा. ११९५ सी वॉर्ड, सोमवार पेठ, कोल्हापूर) यांनी दिली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्या आहेत.
मुस्लिम बोर्डिंग निवडणुकीच्या कारणावरून बुधवारी (दि. २७) दुपारी अज्ञातांनी रविवार पेठ, महात गल्ली येथील तडाखा फ्रेंडस् सर्कलचे अध्यक्ष शौकत इकबाल बागवान यांच्या घरावर हल्ला चढविला. त्यांच्या घरावर पेटते गोळे, दगड, विटा भिरकावल्या तर घरातील प्रापंचिक साहित्य आणि दारात लावलेली दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर तडाखा फ्रेंडस् सर्कलच्या कार्यालयासह अन्य तीन दुचाकी, रिक्षाची तोडफोड करून हल्लेखोर पसार झाले. या प्रकारामुळे परिसरातील महिला भयभयीत झाल्या. घटनास्थळी पोलीस आल्याने जमाव पांगला व स्थिती नियंत्रणाखाली आली. या प्रकरणी शाकिरा शौकत बागवान (३८) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली.
त्यानुसार संशयित इरफान हलगले, सूरज साखरे, शाहरूख शिकलगार, सुयम डांगे, युनूस मुजावर, जमिर मणेर, आसीफ दिलावर खान, पप्पू रणदिवे, कय्यूम डांगे अशा नऊ जणांसह अज्ञात सहा अशा पंधरा जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा दोघा संशयितांना ताब्यात घेतले. गुरुवारी पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
याबाबत तानाजी सावंत म्हणाले, मुस्लिम बोर्डिंग निवडणुकीपूर्वी व निवडणुकीनंतरही शौकत बागवान यांचा मुलगा विरोधकांना त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून हा हल्ला झाला असे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. याप्रकरणी संशयित सुयम डांगे, युनूस मुजावर, कय्यूम डांगे, कलाह शेख व आसिफ खान या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भा. दं. वि.संहिता कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३९५ (दरोडा), ४३५ (जाळून नुकसान करणे), ४२७ (नुकसान) अशाप्रकारचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून गुन्'ात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आलेली नाहीत.
दरम्यान, रविवार पेठ येथे झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणात पूर्वग्रहदूषित बुद्धीने माझे पती सूरज साखरे यांचे नाव गोवण्यात आले आहे. वस्तुत: काही दिवसांपूर्वी एका पक्षाची सभा नुकतीच कोल्हापुरात आयोजित करण्यात आली होती. या पक्षाची विचारसरणी देशहितास बाधक असल्याने माझे पती सूरज साखरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या सभेस विरोध केला होता. त्याचाच राग मनात धरून काही समाजकंटकांनी सूरज साखरे यांना या प्रकरणात गोवले. याबाबतचे पत्रक पत्नी रविना साखरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.शौकत बागवानसह पाच जणांवर गुन्हा...सोमवार पेठेतील इम्रान मणेर हा त्यांचे मित्र विनायक चंदुगडे, मुकुंद यादव असे तिघेजण चंदुगडे यांच्या दुचाकीवरून बुधवारी (दि. २७) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास राजारामपुरी येथील बिग बझार येथून जात होते. हे तिघेजण असलेल्या एका बेकरीसमोरील पानपट्टीजवळ सिगारेट ओढण्यासाठी थांबले. याच सुमारास यादवनगरातील संशयित इर्शाद बागवान, फैजल शेख, अकिब बागवान, जैत बागवान या तिघांनी इम्रान मणेर याला ‘तू मुस्लिम बोर्डिंगच्या इलेक्शनमध्ये लई पुढे-पुढे करत होतास’ असे म्हणून शिवीगाळ करत कोटितीर्थ तलाव येथील झाडीत नेले. ‘शौकत बागवान यांच्या घरावर हल्ला करून आलास काय, तुला आता जिवंत ठेवणार नाही’ असे म्हणून इर्शाद बागवानने इम्रानच्या डोक्यात तलवारीने हल्ला केला तर फैजल शेख याने डाव्या पायाचे गुडघ्याच्या वरील बाजूस कोयत्या मारला. त्यानंतर जैद बागवान व अकिब बागवान या दोघांनी इम्रानच्या पाठीत काठीने मारहाण केली. त्यात इम्रान मणेर जखमी झाले. इम्रानवर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याने संशयित शौकत बागवान, इर्शाद बागवान, फैजल शेख, अकिब बागवान, जैद बागवान (सर्व रा. यादवनगर, कोल्हापूर) यांच्याविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणास अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.त्यानुसार या पाच जणांविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३६३ (अपहरण), १४३, १४७, १४८ व १४९(गर्दी व मारामारी), ५०४ (शिवीगाळ ), ५०६ (दमदाटी) या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे करत आहेत.