कोल्हापूर : जागेचा ताबा घेण्यावरून कोटीतीर्थ मार्केटसमोरील आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाउंडमधील पाच घरांवर सुमारे १५० तरुणांच्या जमावाने हल्ला करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. हल्लेखोरांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह सहाजण जखमी झाले. धक्काबुक्की, हाणामारी, पळापळ आणि आरडाओरडा अशा वातावरणात हल्लेखोरांनी काही घरांतील प्रापंचिक साहित्य विसकटले. याप्रकरणी १५ संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर ााचजणांना घटनास्थळीच पोलिसांनी पकडले.जीवन दळवी, शांता दळवी, शिशिर जाधव, प्रज्ञा जाधव, नितीन बावडेकर, पल्लवी स्वप्निल बावडेकर (सर्व रा. आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाउंड, कोटीतीर्थ मार्केटसमोर, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाउंडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून २० कुटुंबे राहतात. गेल्या १५ दिवसांपासून या जागेबाबत वाद धुमसत आहे. ‘या जागेतील घरे रिकामी करा, सोडून जावा, जागा आमची आहे,’ अशा धमक्या काही युवक तेथील कुटुंबांना देत होते. त्यामुळे परिसरातील सर्वच कुटुंबे दहशतीच्या छायेखाली होती.गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुमारे १५० जणांचा जमाव जेसीबी मशीन घेऊन परिसरात दाखल झाला. काहींच्या हातात हॉकी स्टीक होत्या, तर काहींच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी काही घरांवर हल्ला केला. महिलांना धक्काबुक्की करून लाथाबुक्यांनी मारहाण केली, घरातून बाहेर ओढून काढण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील रहिवासी घाबरले. परिसरात पळापळ, आरडाओरडा असे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांचा हा गोंधळ सुमारे अर्धा तास सुरू होता. हल्लेखोरांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी केलेल्या बळाच्या वापरामुळे हल्लेखोर जेसीबी मशीनसह पळून गेले. याबाबत राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळीच किशोर कृष्णा कलगुटकी (रा. मंगळवार पेठ, मिरज, सांगली), धनंजय महादेव गड्यावर (रा. दत्त चौक, मिरज), राहुल जवान कवाळे (रा. मातंग वसाहत, राजारामपुरी), इम्रान हुसेन पठाण (रा. शास्त्रीनगर), सचिन एकनाथ दुर्वे (रा. संभाजीनगर) यांना घटनास्थळी पकडले. या हल्याबाबत प्रसिल्ला उर्फ लीना इमॅन्युएल कांबळे (रा. आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाउंड, राजाराम रोड) यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की आम्ही राहत असलेली जागा कोल्हापूर चर्च कौन्सिल या संस्थेच्या मालकीची असून, तेथे काम करत असल्याने संस्थेने बांधलेल्या घरात आम्हाला राहण्यास दिले आहे. येथे आमचे पूर्वज १९२४ पासून राहतात. संस्थेच्या जागेच्या पश्चिमेस पाणंदी पलिकडे सुनील पंडितराव शेळके यांची मिळकत आहे. त्यांचा आमच्या संस्थेच्या जागेच्या पश्चिमेस पाणंदीच्या पूर्वेसह त्यांची मिळकत असल्याचा त्यांचा गैरसमज आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कोणत्याही न्यायालयात दावा दाखल केलेला नाही; पण आमच्याविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे, त्याची चौकशी सुरू असताना त्यांनी हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.घरातील साहित्य विस्कटलेहल्लेखोरांनी परिसरात येताच ‘सर्वांनी घराबाहेर या, ही जागा आमची आहे,’ अशा धमक्या देण्यास सुरुवात केली, हल्लेखोरांत युवकांसह महिलांची संख्या मोठी होती. काहींनी विरोध केल्यानंतर हल्लेखोर काही घरांत घुसले व त्यांनी घरातील फॅन, गादी, दूरदर्शन संच, प्रापंचिक साहित्य विस्कटले.संशयितांची नावेकिशोर कृष्णा कलगुटकी (रा. मंगळवार पेठ, मिरज, सांगली), धनंजय महादेव गड्यावर (रा. दत्त चौक, मिरज), राहुल जवान कवाळे (रा. मातंग वसाहत, राजारामपुरी), इम्रान हुसेन पठाण (रा. शास्त्रीनगर), सचिन एकनाथ दुर्वे (रा. संभाजीनगर) यांच्यासह सूरज नलवडे (दौलतनगर), सूरज नलवडे (जवाहरनगर), विनायक पाटील, गणेश बुचडे, नितीन पाटील, रोहन साळोखे, सनी शिंदे, पिंटू सातपुते, अमोल पाटील, सचिन कवाळे अशी संशयितांची नावे पोलिसांना निष्पन्न झाली. त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
जागेच्या वादातून जमावाचा पाच घरांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:46 AM