कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आजरा, चंदगडसह सिंधुदूर्ग व गोवा राज्याचे पूर्व भागात अवैध मद्य तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय कुप्रसिध्द ‘श्रीधर भाई गँग’ला मोका लावण्यात आला. मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी ही कारवाई केली.गँगचा म्होरक्या संशयित श्रीधर अर्जुन शिंगटे (वय ३५, रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज), त्याचे साथीदार नेल्सन ईजामाईल फर्नांडीस उर्फ बाबा नेल्सन (३०, रा. सालेवाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), चेतन विनायक साठेलकर (३०, रा. भटवाडी बाहेरचा वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), यशवंत चंद्रकांत कारीवडेकर (३५, रा. ज्युस्तीनगर, सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), कृष्णा अनिल म्हापसेकर (रा. मेनगार्डन, जवळ सावंतवाडी) अशी त्यांची नावे आहेत.कुप्रसिध्द गुंड श्रीधर शिंगटे हा साथीदारांच्या मदतीने खूनाची सुपारी घेवून अवैध अग्नीशस्त्राचा वापर करुन खून करणे, प्राणघातक शस्त्रानिशी दरोडा, खंडणी, पैशची वसुली करीता अपहरण, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे करीत होता. त्याचे विरोधात संघटीत गुन्हेगारीचे नऊ गुन्हे दाखल आहेत.
आंतरराज्यीय मद्यचोरीमध्येही त्यांची व्याप्ती मोठी होती. संशयित शिंगटे व नेल्सन फर्नांडीस यांचा निष्पन्न झालेला सहभाग, तसेच सीमावर्ती भागातील पट्टयामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांना प्रभावीत करण्याचे हेतूने या गँगचा वापर होवू शकतो. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलीस उपअधीक्षक अनिल कदम यांना शिंगटे गँगच्या विरोधात मोका कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी दाखल प्रस्ताव्याची छानणी करुन डॉ. देशमुख यांच्या मंजूरीने तो विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके यांच्याकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविला होता. त्यांनी टोळीच्या समुळ उच्चाटणासाठी मंजूरी दिली. या मोका कारवाईचा तपास पोलीस उपअधीक्षक कदम करीत आहेत.कारवाई करण्यासाठी आराखडालोकसभा निवडणुकीमध्ये अनेक गुन्हेगारी टोळ्या व सराईत गुन्हेगारांचा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा गुन्हेगारी टोळी व गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. टप्याटप्याने ही कारवाई केली जाणार आहे.