सातवे : सातवे (ता. पन्हाळा) येथील जलस्वराज्य योजनेतील एक कोटी ११ लाख रुपयांच्या पाणी योजनेच्या गैरकारभारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी कोडोली पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणातील चार महिला व सामाजिक लेखा परीक्षणच्या अध्यक्षाला अटक केली. त्यांना पन्हाळा येथील प्रथम न्याय दंडाधिकारी ठोंबरे यांनी न्यायालयीन कोठडी दिली. याबाबत कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सातवे (ता. पन्हाळा) येथील जलस्वराज्य योजनेच्या सबलीकरण समीतीच्या सचिव मीनाक्षी आनंदराव पाटील (वय ४७), कमल सदाशिव माळी (४२), ज्योती उमेश चौगुले (३२), संगीता विश्वास चौगुले (४६), एका संस्थेचे मॅनेजर व या योजनेचे लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष सर्जेराव यशवंत ढेरे (४६, सर्व राहणार सातवे, ता. पन्हाळा) यांना अटक झाली आहे, तर चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील मृत ठेकेदार रामचंद्र पोवार यांची पत्नी हिराबाई रामचंद्र पोवार यांना अद्याप अटक झाली नाही. जागतिक बँकेच्या अर्थसहायाने सातवे गावासाठी सन २००६-२००७ साली जलस्वराज्य योजनेतून एक कोटी ११ लाख मंजूर झाले होते. ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा महिला सबलीकरण सामाजिक लेखा परीक्षण या समितीतर्फे अंमलबजावणी झाली. दहा टक्के लोकवर्गणी जमा केली. कामाचा ठेका कऱ्हाड तालुक्यातील चचेगावचे ठेकेदार रामचंद्र पोवार यांनी घेतला होता. काही दिवसांनी त्यांच्या मृत्यू झाला. या योजनेची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य उत्तम नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी तक्रारीद्वारे केली होती. उत्तम नंदूरकर यांनी १५ आॅगस्ट २०१४ला चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी उपोषणाचा इशारा देऊन जोरदार रेटा लावला होता. त्यामुळे योजनेतील कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यास हयगय करणे, गहाळ करणे, असा १२ जणांवर ठपका ठेवला. त्यावेळी १२ जणांवर संबंधित कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुबेदार यांनी दिला होता. ‘लोकमत’चाही पाठपुरावा जानेवारी २०१५ मध्ये सातवे पाणी योजनेतील गैरव्यवहारावर तीन भागांत मालिका प्रसिद्ध करून ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. गुन्हा दाखल होऊनही १२ जण मोकाटच, अशी बातमी प्रसिद्ध करून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष वेधले होते; परंतु सोमवारी चार महिला व पतसंस्थेच्या मॅनेजरला अटक केल्याबद्दल कोडोली पोलिसांबाबत सातवे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
सातवेतील पाणी योजनेच्या अपहारप्रकरणी पाचजणांना अटक
By admin | Published: October 13, 2015 1:00 AM