कोल्हापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर पूर्वपदावर येऊ लागलेल्या एस.टी.ला शनिवारी पुन्हा एकदा ब्रेक लागला. दुसऱ्या लाटेतील लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी केवळ पाच बसेस कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातून जिल्ह्यातील विविध भागांत धावल्या. मात्र, या बसेसचा डिझेलचाही खर्च भागला नाही, असे चित्र होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्याच्या कानाकोपऱ्यात दिवसाला पाचशे बसेस कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातून धावत होत्या. पुन्हा दुसरी लाट आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून हाच आकडा अगदी १५० ते २०० बसेसवर आला. वाहक, चालकांनाही एक दिवसाआड कामावर येण्यास बजावण्यात आले. अनेक प्रशासकीय, कार्यालयीन खर्चाला फाटा देण्यात आला. याशिवाय जे कर्मचारी ५० वर्षांवरील आहेत. अशा कर्मचाऱ्यांकरिता निवृत्तीची योजनाही एस.टी. महामंडळाने आणली आहे. त्यात कोल्हापूर विभागातील अनेक कर्मचारी पात्रही ठरले आहेत. अशा परिस्थितीत काहीअंशी तग धरू पाहणाऱ्या एस.टी.ची चाके पुन्हा रुतली.
मुंबईला आज गाड्या
आज, रविवारी रात्री मुंबई, पुणे या मार्गांवर जाण्यासाठी बसेसना आजरा, गडहिंग्लज, गारगोटी या भागांतून प्रवाशांनी आरक्षण केले आहे. पुरेशा प्रमाणात प्रवाशांची संख्या झाल्यास या मार्गांवर मागणीप्रमाणे बसेस सोडल्या जाणार आहेत.
पाच बसेस यांच्यासाठी धावल्या
मुरगूड, गडहिंग्लज, आजरा, गारगोटी या मार्गांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि पुणे, मुंबईहून शुक्रवारी रात्री कोल्हापुरात गावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांकरिता या बसेस सोडण्यात आल्या. प्रवाशांची मागणी आणि पुरेशा प्रमाणात प्रवासीसंख्या यांचा विचार करून या बसेस या भागात सोडण्यात आल्या. पुरेशा प्रमाणात प्रवासी नसल्याने गाड्या सोडण्यात आल्या नाहीत; त्यामुळे प्रवासी बसून होते.
कोट
लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून प्रवाशांची मागणी आणि संख्या यांचा मेळ घालून विविध ठिकाणी बसेस सोडण्यात आल्या. मात्र, लाॅकडाऊनमुळे प्रवाशांनीही प्रवास करण्याकडे पाठ फिरविली. प्रवासीच नसल्यामुळे महामंडळास लाखो रुपयांचा फटका बसला.
- शिवराज जाधव,
विभागीय वाहतूक अधिकारी, कोल्हापूर विभाग, एस.टी. महामंडळ
फोटो : १००४२०२१-कोल-एसटी
ओळी : नेहमी गजबजलेल्या कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात लाॅकडाऊनमुळे प्रवाशांची संख्या अशी रोडावली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)