कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना पाच हजारांचे अनुदान देण्यात येत असून या योजनेच्या जनजागृती करण्याकरीता दि. २ ते ८ डिसेंबरदरम्यान शहरात मातृवंदना सप्ताह राबविण्यात येणार आहे.दि. १ मे २०१८ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ पहिल्या जीवित अपत्यासाठी शासननिर्णयानुसार पाच हजार रुपये इतके अनुदान दिले जाते.
या अनुदानाचा पहिला टप्पा एक हजार रुपये मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर, दुसरा टप्पा दोन हजार रुपये किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी केल्यापासून सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आणि प्रसुती झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही वा पेंटाव्हॅलेंट तसेच त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर तिसरा हप्ता दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिलेल्या निर्देशानुसार आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांचे अध्यक्षतेखाली शनिवारी पंचगंगा हॉस्पिटल येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये सर्व प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.मोहिमेच्या पहिल्या दिवशी सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सर्व अंगणवाडी किंवा इतर सामान्य ठिकाणी विविध उपक्रम या सप्ताहामध्ये होणार आहेत. या मोहिमेचा लाभ मिळणेकामी पात्र लाभार्थ्यांनी शहरातील संबंधित प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.