कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा विषय सध्या वादग्रस्त बनला आहे. हा विषय अधिक ताणला जाऊ नये आणि योग्य समन्वय साधला जावा म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनीच राज्य सरकारला पाठविलेल्या हद्दवाढ प्रस्तावात शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली आणि नागांव अशी पाच गावे वगळण्याची शिफारस केल्याची माहिती पुढे आली आहे.शिवाय शिरोली पुलाची या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्याची सूचना नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी केली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ आणि शिरोलीची नगरपंचायत करण्याचे नगरविकास विभागाचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने १८ जानेवारी २०१४ रोजी १६ गावे आणि गोकुळ शिरगांव व शिरोली या दोन औद्योगिक वसाहतीचा समावेश शहराच्या हद्दीत करावा म्हणून प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दि. १२ जून २०१५ रोजी पुन्हा एक सुधारित प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारला पाठविला होता. त्यामध्ये १८ गावे व दोन औद्योगिक वसाहतींचा समावेश होता. त्यानुसार हद्दवाढ विरोधक आणि समर्थक अशा दोन्ही बाजूंचा विचार करून जिल्हाधिकारी अमित सैनी यांना अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू समजावून घेऊन त्यांचा अहवाल दि. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी नगरविकास विभागास सादर केला. त्यात त्यांनी पंचगंगा नदीच्या प्रवाहानुसार शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली, नागांव अशी पाच गांवे आणि शिरोली व गोकुळ शिरगांव या दोन औद्योगिक वसाहती हद्दवाढीतून वगळणे योग्य होईल, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या शिफारशीमुळे हद्दवाढीला होणारा विरोध काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी रा. शा. कौरते यांनी जिल्हाधिकारी अमित सैनी यांना बुधवारी (दि. २ मार्च)ला पत्र पाठवून शिरोली पुलाची ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदी तपासून स्वयंस्पष्ट अहवाल दोन आठवड्यांत सरकारला सादर करण्याची सूचना केली आहे. या पत्रावरून राज्य सरकार शिरोली पुलाची नगरपंचायत करण्यात आणि काही गावे वगळून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यास इच्छुक असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)ही आहेत गावे शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली आणि नागांव अशी पाच गावे वगळण्याची शिफारस केल्याची माहिती पुढे आली आहे.
हद्दवाढीतून पाच गावे वगळणार
By admin | Published: March 05, 2016 12:31 AM