शिरोली : गेली पाच वर्षे मृत्यूशी झुंज देणाऱ्या संदीप मधुकर टिळे (वय ३८) याने सोमवारी सीपीआरमध्ये अखेरचा श्वास घेतला. पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत भेंडे गल्ली येथे डॉल्बीच्या आवाजाने गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात तो जखमी झाला होता. हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही त्याची जगण्याची धडपड अखेर अयशस्वी ठरली. पाच वर्षांपूर्र्वी संदीप आपल्या कुटुंबाला घेऊन गणेश विसर्जन मिरवणूक बघायला गेला होता. महाद्वार रोडवरील भेंडे गल्लीत तो मिरवणूक बघत असताना डॉल्बीच्या आवाजाने इमारतीची गॅलरी कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. अन्य १६जण जखमी झाले होते. त्यात संदीपही गंभीर जखमी झाला होता. संदीपच्या पाठीवरच भिंत कोसळल्यामुळे कमरेखालील भागच तुटल्याने तो अधू झाला. गेल्या पाच वर्षांपासून तो अंथरुणावरच पडून होता. उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून संदीपची पत्नी घरीच त्याच्यावर उपचार करीत होती. या अपघातामुळे टिळे कुटुंबच उद्ध्वस्त झाले होते.मूळचा इस्लामपूरचा असलेला संदीप आपली पत्नी आणि दोन मुलांना घेऊन शिरोली माळवाडी भागात राहात होता. पत्नीला घर चालवणेही मुश्किल झाले होते. यात तब्बल पाच वर्षांनंतर इस्लामपूर येथील मित्रांना ही घटना समजली. त्यांनी पंधरा आॅगस्ट रोजी संदीपला दोन लाखांची मदत केली होती. तसेच कोल्हापूर येथील मराठा रियासत व्हॉटस अॅप ग्रुपनेही जखमी संदीप टिळेला २० हजाराची मदत केली होती. पण ही मदतही व्यर्थ ठरली. डॉल्बीमुळे कुटुंब उद्ध्वस्तडॉल्बी लावणारे, त्याच्यावर बेफाम होऊन नाचणारे नाचले, पण या डॉल्बीने टिळे कुटुंबाला उद्ध्वस्तच करून टाकले. संदीप टिळे याचा मृत्यू सर्वांना चटका लावणारा ठरला आहे. डॉल्बीचा घातक परिणाम या निमित्ताने ठळक झाला.चक्कर आली अन् कोमातसंदीपची रविवारी दुपारी अचानक तब्येत खालावली. चक्कर आल्याने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये नेण्यात आले. पण तो कोमात गेला. सोमवारी दुपारी तीन वाजता त्याचा मृत्यू झाला.
पाच वर्षांची मृत्यूशी झुंज अयशस्वी
By admin | Published: October 06, 2015 1:11 AM