कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये उद्योग, व्यापार तीन महिने बंद होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उद्योग, व्यापार सुरू झाले. मात्र, अद्याप ते पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. त्यामुळे लॉकडाऊनमधील वीज बिलांवरील स्थिर आकार पूर्णपणे रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. त्याबाबतचे निवेदन ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ऑगस्टमध्ये वीज बिलावरील स्थिर आकार पूर्णपणे रद्द करण्यास मान्यता देखील दिली होती. मात्र, नोव्हेंबरनंतर प्रत्येक वीज बिलावर जादाचा स्थिर आकार आकारला जाऊन बिले पाठविली जात आहेत. जर शासनाने वीज बिलावरील स्थिर आकार पूर्णपणे रद्द केला नाही, तर उद्योग व व्यापार बंद पडणार आहेत. त्याचा विचार करून जादाचा स्थिर आकार रद्द करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या शिष्टमंडळात आमदार चंद्रकांत जाधव, चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, सचिव धनंजय दुग्गे, संचालक विज्ञानंद मुंढे, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, उपाध्यक्ष मोहन पंडितराव यांचा समावेश होता.