कागल : पुणे-बंगलोर महामार्गाच्या चौपदरीकरण कामात कागल शहराच्या हद्दीत राहिलेल्या त्रुटी सहापदरीकरणाच्या कामावेळी दूर केल्या जातील. तसेच सहापदरीकरण मार्ग कृती समितीने केलेल्या मागण्याचींही दखल घेतली जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य विकास मंडळाच्या कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डी यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.चौपदरीकरणाच्या कामात त्रुटी राहिल्याने आणि आवश्यक ठिकाणी उड्डाण पूल, बोगदे, बाजूचे रस्ते नसल्याने नागरिकांना गेली दहा -बारा वर्षे हा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ही कृती समिती स्थापन करून आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी याबद्दल संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांना याची कल्पना दिल्यानंतर रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कागलला नुकतीच भेट देऊन या रस्त्याची पाहणी केली. तेव्हा नम्रता रेड्डी यांनी हे आश्वासन दिले. पक्षप्रतोद रमेश माळी, कृती समितीचे उपाध्यक्ष संजय ठाणेकर, नगरसेवक संजय चित्तारी, प्रकाश गाडेकर, सुनील निवृत्ती माळी, अभियंता सुनील माळी, इरफान मुजावर या पदाधिकाऱ्यांसह रस्ते विकास मंडळाचे उपअभियंता समाधान पाटील, सूरज शहा, विनोद चौगुले, आदी उपस्थित होते. चौपदरीकरण कामाच्या वेळी कागलकरांनी निकृष्ट दर्जाचे काम, चुकीच्या पद्धतीने नियोजन याबद्दल काम बंद पाडण्याचेही आंदोलन केले होते. कागलजवळ या महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण पडतो. कारण कागल हे कर्नाटक-महाराष्ट्राला जोडणारे ठिकाण आहे, तसेच मुरगूड-इचलकरंजी या बाजूनेही येथे वाहतूक होते. त्यामुळे येथील रस्ते कुचकामी ठरून वाहतुकीची कोंडी होते. शेजारच्या कर्नाटक हद्दीतील रस्त्यांची कामेही पहावीत, असे यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मागण्या आणि पाहणीलक्ष्मी मंदिर ते नवीन आर. टी. ओ. चेकपोस्टपर्यंत दोन्ही बाजूने ७ मीटर रुंदीचा सर्व्हिस रस्ता, ड्रेनेज करावे. वृक्षारोपण, स्ट्रीट लाईट, स्वच्छतागृहे, पाणी व्यवस्था करावी. या मागण्या केल्या. शिष्टमंडळानेही प्रत्यक्ष या जागांना भेटी देत सर्व नोंदी करून घेतल्या.
सहापदरीकरणात त्रुटी दुरुस्त करणार
By admin | Published: August 13, 2016 12:10 AM