राम मगदूम। गडहिंग्लज
जन्मापासूनच आलेल्या अंधत्वावर मात करून गडहिंग्लजच्या लेकीने शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेत आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली. तिने हिंदी विषयात विद्यापीठात पाचवा तर भाषा विभागात आठवा क्रमांक पटकाविला. केवळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर उत्तुंग यशाला गवसणी घातलेल्या या तरुणीचे नाव आहे, रतन बाबूराव गुरव. बेकनाळ (ता. गडहिंग्लज) या गावची ती रहिवासी. तिचे वडील पोलीस दलातून निवृत्त झाले असून आई गृहिणी आहे. त्यांना सुमन, रतन व ओंकार अशी तीन मुले आहेत. यापैकी रतन आणि ओंकार दोघेही जन्मापासून अंध आहेत.
अंध असूनही रतनची शिकण्याची जिद्द दांडगी. गावातून एसटी नसल्यामुळे आत्या सोनाबाईच्या मदतीने दररोज पायपीट करून तिने दहावी व बारावीतही ७० टक्याहून अधिक गुण मिळविले. परंतु, वयोमानामुळे आत्या थकल्यामुळे भावंडांचे शिक्षण थांबू नये म्हणून मोठी बहीण सुमन तिच्या मदतीला धावून आली. सुमनचे माहेर कर्नाटकात असून पती राजकुमार हे संकेश्वर आगारात कंडक्टर आहेत. केवळ भावंडांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी गडहिंग्लजमध्ये भाडोत्री घर घेऊन रतन व ओंकारला आपल्याजवळ ठेवून घेतले आहे. दररोज त्यांना महाविद्यालयाला सोडणे आणि आणण्याबरोबरच त्यांचा अभ्यासही त्याच घेतात. पदवी परीक्षेत ७८ टक्के गुण मिळविलेल्या रतनने पदव्युत्तर पदवी परीक्षेतही ७९.३१ टक्के गुण मिळविले आहेत. सध्या तिने सेट-नेटचा अभ्यासही सुरू केला आहे.
तिला प्राचार्य मंगलकुमार पाटील यांचे प्रोत्साहन तर प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. सरोज बिडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
------------------------
* तिला व्हायचंय संगीत शिक्षिका
रतनने शालेय शिक्षणापासूनच संगीत शिक्षणाचे धडेही गिरवायला सुरू केले आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये ती मध्यमा उत्तीर्ण झाली असून विशारद होऊन तिला संगीत शिक्षिका बनायचे आहे. ‘रायटर’ न मिळाल्यामुळे तिला पदवी परीक्षा देता आली नव्हती. परंतु, हार न मानता तिने आता पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
------------------------
* रतनने ब्रेल लिपी शिकण्याचा प्रयत्न केला. पण, ते शक्य झाले नाही. त्यामुळे बहीण सुमन या तिला व ओंकारला पाठ्यपुस्तकातील धडे अन् नोट्स वाचून दाखवितात. त्याचे आणि मोबाईलवर रेकॉर्डिंग केलेले वर्गातील लेक्चर्स वारंवार ऐकूनच त्यांचे शिक्षण सुरू आहे. सध्या ओंकार हा मराठी विषय घेऊन कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत आहे.
------------------------
दरम्यान, लग्नामुळे बारावीनंतर शिक्षण थांबलेल्या बहीण सुमन यांनीही तब्बल १० वर्षांच्या खंडानंतर भावडांचा अभ्यास घेता घेता स्वत:चेही शिक्षण पुढे सुरू केले. त्यांनीही समाजशास्त्र विषयात एम.ए. ला विद्यापीठात नववा क्रमांक मिळविला आहे.
------------------------
* रतन गुरव : ०८०४२०२१-गड-०७