कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. १८ जागांसाठी विविध गटांतून २५० जणांचे तब्बल ३८३ अर्ज दाखल झाले. सत्तारूढ गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत एकत्रित, तर विरोधी गटाने व्यक्तिगत अर्ज दाखल केले. दिवसभर सिंचन भवन परिसरात तोबा गर्दी झाली होती. ‘गोकुळ’साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारी अखेरचा दिवस असल्याने सकाळपासून निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती. सत्तारूढ गटाने आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागाळा पार्क येथील सर विश्वेश्वरय्या हॉल येथून शक्तिप्रदर्शन करत निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्यासमवेत आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, माजी आमदार बाबासाहेब पाटील, संजय घाटगे, बजरंग देसाई, भरमूण्णा पाटील, नरसिंग गुरुनाथ पाटील, अनिल यादव, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह ठरावधारक उपस्थित होते. सत्तारूढ गटाने अर्ज दाखल केल्यानंतर विरोधी गटाने व्यक्तिगत अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते ए. वाय. पाटील, भैया माने यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी अर्ज दाखल केले तर शेकापच्यावतीने अशोकराव पवार, राजेंद्र सूर्यवंशी, केरबा भाऊ पाटील यांनी अर्ज दाखल केले. भाजपच्यावतीने बाबा देसाई, वैशाली विजय देसाई यांनी अर्ज दाखल केला. माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड व कर्ण गायकवाड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच निवडणूक कार्यालयात गर्दी उसळली होती. अर्ज भरण्यासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. सर्वसाधारण गटातील १३ जागांसाठी १४८ उमेदवारांनी २५४ अर्ज दाखल केले. या दिग्गजांचे अर्ज दाखल -सर्वसाधारण गट- धैर्यशील देसाई (गंगापूर), उदय निवासराव पाटील (सडोली खालसा), प्रकाशराव पाटील (कोगे) , अनिल पाटील (वाकरे) , बाजीराव पाटील (वडणगे), रवींद्र आपटे (उत्तूर), रणजितसिंह पाटील (मुरगूड), मंजुषादेवी पाटील (मुरगूड), सुरेश पाटील (कसबा बीड), प्रकाश चव्हाण (चन्नेकुप्पी), अरुण नरके (बोरगांव), संदीप नरके (बोरगांव), दिलीपराव पाटील (शिरोळ), दीपक पाटील (बसर्गे), ज्योती पाटील (बसर्गे), शशिकांत पाटील (चुये), रणजितसिंह माने-पाटील (शिरोळ), अमरिश घाटगे (शेंडूर), सदानंद हत्तरकी (हलकर्णी), सुरेशराव चव्हाण-पाटील (निट्टूर), युवराज पाटील (मौजे सागांव), बाळासाहेब खाडे (सांगरुळ), भैया माने (कागल), दौलतराव जाधव (सोनारवाडी), विजय देसाई (कळंबे तर्फ ठाणे), किरणसिंह पाटील (येवती), सत्यजित जाधव (तिरवडे), रामराजे कुपेकर (कानडेवाडी), अरुण इंगवले (आळते), भूषण पाटील (वाळवे खुर्द), राजेश पाटील (म्हालेवाडी), विश्वास पाटील (शिरोली), ए. वाय. पाटील (सोळांकूर), कृष्णराव किरुळकर (राशिवडे), प्रकाश देसाई (देसाईवाडी), बाळासाहेब कुपेकर (कानडेवाडी), कर्ण गायकवाड (सुपात्रे), नीता नरके (बोरगांव), अरुण डोंगळे (घोटवडे), चंद्रकांत बोंद्रे (फुलेवाडी), अशोकराव पवार (सडोली खालसा).महिला- अनुराधा पाटील (सरुड), अरुंधती घाटगे (व्हनाळी), जयश्री पाटील (चुये), वैशाली देसाई (कळंबे तर्फ ठाणे), सुशीला भोईटे (पालकरवाडी), संजीवनीदेवी गायकवाड (सुपात्रे), अंजना रेडेकर (पेद्रेवाडी).अनुसूचित जाती - दिनकर कांबळे (आदमापूर), वसंत नंदनवाडे(नूल), राजू आवळे (गंगानगर). इतर मागासवर्गीय - विश्वास पाटील, सचिन पाटील व सुनील पाटील (शिरोली), बाळासाहेब खाडे (सांगरुळ), युवराज पाटील (सागाव), हिंदुराव चौगले (ठिकपुर्ली).भटक्या विमुक्त - विश्वास जाधव, पांडुरंग चव्हाण (कोथळी). अप्पांचा मुहूर्त!--सोमवारी सकाळी सव्वाअकरा वाजता सत्तारूढ गटाचे अर्ज दाखल करायचे होते. त्यामुळे आमदार महाडिक यांच्यासह संचालक व कार्यकर्ते सर विश्वेश्वरय्या हॉल येथे सकाळी दहापासूनच थांबले होते. पी. एन. पाटील अकरा वाजता आल्यानंतर ‘चला, ११.०५ झाले, मुहूर्त साधायचा आहे,’ असे सांगत महाडिक यांनी सर्वांबरोबर निवडणूक कार्यालय गाठले.इच्छुकांची घालमेल आणि धडपडसत्तारूढ गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचे जोरदार प्रयत्न आहेत. सर विश्वेश्वरय्या हॉल येथे प्रत्येकाने शक्तिप्रदर्शन करून नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी धडपड सुरू होती, पण स्पर्धक कोणी अर्ज भरतो का? यासाठीही घालमेल दिसत होती. रामराजेंबरोबर खासदार महाडिकरामराजे कुपेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक व आमदार संध्यादेवी कुपेकर आले होते, तर बाळासाहेब कुपेकर यांनी भैयासाहेब कुपेकर व संग्राम कुपेकर यांच्या उपस्थित अर्ज दाखल केला. ‘बाबां’ना बरोबर घ्यासत्तारूढ गटाचे अर्ज दाखल करताना भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई हे कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्यांना जवळ बोलावून, अरे ‘बाबां’ना बरोबर घ्या, असे सांगत पी. एन. पाटील व आपल्या बरोबर घेऊन फोटो काढल्याने अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीला उमेदवारी देणार : महाडिकवाकड्यात जाणाऱ्यांबरोबर विरोध कायमकोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघावर साडेसहा लाख गोरगरीब दूध उत्पादकांचे जीवनमान अवलंबून आहे, त्या भावनेतून आम्ही कारभार करत असल्याने दूध संस्थांचा आमच्यावर विश्वास आहे. म्हणूनच जे बरोबर येतील त्यांना घेऊन जाणार असून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी देऊन सर्व पक्षांना न्याय देणार असल्याची माहिती आमदार महादेवराव महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी सत्तारूढ गटाचे उमेदवारी अर्ज सोमवारी शक्तिप्रदर्शनाने दाखल केले. सिंचन भवन येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर आमदार महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार महाडिक म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात पी. एन. पाटील व आपण एकत्र आहोत. ‘गोकुळ’ दूध संघ हा बारा बलुतेदारांचा संघ आहे. या भावनेतून संघाचा कारभार चालविल्याने संघाकडे कोणी बोट दाखवू शकत नाही. संघाचे नेतृत्व आपण व पी. एन. पाटील करत असलो तरी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी देऊन सर्व पक्षांना न्याय देण्याचे काम करणार आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला तरी येथील शेतकरी खंबीरपणे आपल्या पायावर उभा राहू शकतो. यामागे ‘गोकुळ’ची ताकद असून दिवसाला तीन कोटी रुपये उत्पादकांच्या घरात जातात. गोरगरिबांचा संघ असल्याने राजकारणापलीकडे जाऊन प्रत्येकाने विचार करायला हवा. विरोधकांना समजावून घेण्याची भूमिका आम्ही पहिल्यापासून घेतलेली आहे. आमचे कोणीही विरोधक नाहीत, जे आमच्या जवळ आले त्यांना बरोबर घेऊन जाणार आहे म्हणूनच ठराव दाखल करण्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व गटा-तटांचे नेते एकवटले आहेत. जी मंडळी वाकड्यात जाणार आहेत, त्यांना विरोध कायम राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.विश्वासापोटीच गर्दीचा महापूर !आजपर्यंत महाडिक व पी. एन. पाटील यांनी जिल्ह्यात विश्वासाचे राजकारण केले. त्यामुळे आज आमच्या मागे सारा जिल्हा उभारला आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेला महापूर हा विश्वासापोटीचा असल्याचे आमदार महादेवराव महाडिक यांनी सांगितले. आप्पांचा उपदेशाचा डोस‘गोकुळ’ दूध संघ हा गोरगरीब बारा बलुतेदारांची अर्थवाहिनी आहे. आम्ही तिथे चांगला कारभार केला आहे. प्रसारमाध्यमांनी चांगल्याला चांगले म्हणावे, असा उपदेशाचा डोस आमदार महाडिक यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाजला.
‘गोकुळ’च्या मलईसाठी झुंबड
By admin | Published: March 24, 2015 12:33 AM