कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव वर्ष ‘लोकमत’कोल्हापूर आवृत्तीच्या वतीने रविवारी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. शिरोली औद्योगिक वसाहत येथील ‘लोकमत’ कार्यालयाच्या आवारात फाईव्ह महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे सुभेदार मेजर हरिचंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ च्या घोषणांनी परिसर दूमदूमून गेला.
‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीतर्फे प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो, यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने लोकमत परिवारात उत्साहाचे वातावरण होते. कोल्हापुरातील फाईव्ह महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे सुभेदार मेजर हरिचंद्र शिंदे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व प्रथम महात्मा गांधी तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनतर मेजर सुभेदार शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी शिंदे यांनी भारतीय लष्कारातील आल्या २९ वर्षे कार्यकाळातील काही घटना सांगितल्या. मुळचे नगर जिल्ह्यातील असलेल्या शिंदे यांनी मणीपूर, जम्मू काश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश येथे देशसेवा केली असून या कार्यकालात झालेल्या सर्चिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. अनेक आव्हाने स्वीकारून त्यांनी कारगीलमधील कासर येथेही युध्दकाळात सेवा बजावली आहे.
अत्यंत शिस्तबध्द व नीटनेटक्या सोहळ्यात लोकमत परिवारात राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन घडले. सामुहिक राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिरसर दूमदूमला. याप्रसंगी लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संतोष साखरे, जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक विवेक चौगुले, श्रीराम जोशी, वृत्त संपादक चंद्रकांत कित्तुरे, उपवृत्त संपादक विश्वास पाटील, सांगलीचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस यांच्यासह सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.