कोल्हापूर : यंदा स्वातंत्र्यदिनी कोल्हापूरमधील शासकीय ध्वजारोहण करण्याचा मान राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मिळाला आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे जळगावमध्ये ध्वजारोहण करणार असल्याने कोल्हापूरचे ध्वजारोहण खोत यांच्या हस्ते होईल.
प्रथेप्रमाणे पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण करण्यात येते. त्यानुसार गेले तीन वर्षे पालकमंत्री पाटील यांच्या हस्तेच ध्वजारोहण होत आले. मात्र, एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जळगावचेही पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
यंदा स्वातंत्र्यदिनी पाटील यांनी जळगावमध्ये ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी (१५ आॅगस्ट)ला सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे ध्वजारोहण होईल.