फुलेवाडी : गेल्या सहा महिन्यांपूर्वी पाण्याची गळती काढण्यासाठी खोदलेल्या फुलेवाडी-रिंगरोडवरील अयोध्या कॉलनीच्या चौकातील खड्ड्यात एक दुचाकीस्वार पडून जखमी झाला. फुलेवाडी रिंग्ांरोडमधून महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या तसेच फुलेवाडी सोसायटीच्याही पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन गेल्या आहेत. महापालिकेची शिंगणापूर योजना गळकी योजना आहे, तर फुलेवाडी सोसायटीची पाईपलाईनही जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी रिंग्ांरोडवर गळती लागली आहे. महापालिकेने दोन वेळा मेगा ब्लॉक करून रिंग्ांरोडवरील गळती काढली आहे तरीही अयोध्या कॉलनीतील गळती शिल्लक होती. ही गळती काढण्यासाठी सोसायटीने अयोध्या कॉलनीतील भरचौकात मोठा खड्डा खणला मात्र पाईपच्या जाळ्यात त्यांना गळती शोधता आली नाही. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही गळती शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनाही गळती सापडली नाही. गळती काढण्यासाठी खणलेला खड्डा हा जीवघेणा बनला असून नागरिकांनी तो त्वरित बुजवण्यासाठी तक्रारी करूनही त्याकडे सोसायटीने दुर्लक्ष केले. त्यातच अयोध्या कॉलनी ते लक्ष्मीनारायण कॉलनीदरम्यान रिंगरोडवर दिवे नसल्याने वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे एक दुचाकीस्वार खड्ड्यात पडून जखमी झाला. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला त्वरित बाहेर काढण्यात आले. प्रशासनाने हा खड्डा त्वरित बुजवावा, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांतून होत आहे.
फुलेवाडीत जीवघेणा खड्डा !
By admin | Published: June 17, 2014 1:40 AM