कोल्हापूर : कोल्हापूर-बंगळुरू मार्गावरील विमानसेवेची सुरुवात दि. १३ जानेवारीपासून होणार आहे. इंडिगो कंपनी या मार्गावर सेवा पुरविणार आहे. आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा असणार आहे. बंगळुरूमधून हे विमान पुढे कोईम्बतूरला जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, शिक्षण आणि नोकरीनिमित्त बंगळुरू, कोईम्बतूरमध्ये असलेल्या विद्यार्थी, नोकरदारांची विमान प्रवासाची सोय होणार आहे.इंडिगो कंपनीकडून सध्या कोल्हापुरातून तिरूपती, अहमदाबाद आणि हैदराबाद या मार्गावर विमानसेवा पुरविण्यात येत आहे. या कंपनीने आता बंगळुरू मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेची तिकीट नोंदणी आणि वेळापत्रकही जाहीर केले आहे. सध्या या मार्गावरील विमानसेवा बंद आहे. ‘कोल्हापूर-बंगळुरू’ विमानसेवा पूर्ववत आणि लवकरच सुरू करण्यात येईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. दरम्यान, कोल्हापूर-बंगळुरू अशी विमानसेवा सुरू होत असल्याचा आनंद आहे. बंगळुरू हे आयटी हब, तर फौंड्री आणि अन्य उद्योगांसाठी कोईम्बतूर प्रसिद्ध आहे. या विमानसेवेने कोल्हापुरातील उद्योजक, नोकरदार, विद्यार्थ्यांची वाहतुकीची चांगली सोय होणार असल्याचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी गुरुवारी सांगितले.
विमानसेवेची वेळ अशी...
- बंगळुरूमधून विमान निघणार : दुपारी २ वाजून ५० मिनिटे
- कोल्हापुरात पोहोचणार : दुपारी ४ वाजून ५५ मिनिटे
- कोल्हापुरातून उड्डाण करणार : सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटे
- बंगळुरूमध्ये उतरणार : सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटे