कोल्हापूर : कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध असल्याने कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर- अहमदाबाद गुजरात नियमित विमानसेवा सुरू होणार आहे. सोमवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी ही सेवा सुरू राहणार असून कोल्हापूरहून सकाळी ११ वाजता विमान उड्डाण करेल आणि १२ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी दिली.कोल्हापूरच्या विमानसेवेचा गतीने विस्तार होत असून कोल्हापूर- तिरूपती विमान सेवा सुरू झाली आहे. नागपूर, गोवा तसेच दिल्ली मार्गावर थेट विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आता कोल्हापूरकरांची मागणी असलेली कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात थेट विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. स्टार एअर लाईन कंपनीचे सुमारे ५० आसन क्षमतेचे विमान, कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या विमान सेवेमुळे अहमदाबाद सोबतच गुजरात, राजस्थानसह उत्तर भारताशी कोल्हापूर जोडले जाणार आहे. सध्या 'या' मार्गावर सुरु आहे विमानसेवा सध्या कोल्हापूर- बेंगलोर, कोल्हापूर - हैद्राबाद, कोल्हापूर- मुंबई, कोल्हापूर- तिरूपती या मार्गावर विमानसेवा सुरू असून त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर- अहमदाबाद गुजरात ही सेवा सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सुरू राहणार असून, त्यासाठी तिकीटाचे बुकींग सुरू झाल्याचीही माहिती खासदार महाडिक यांनी दिली.
कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, उत्तर भारताशी कोल्हापूर जोडले जाणार
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 24, 2024 7:18 PM