कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माघारीसाठी आज, सोमवारी निवडणूक कार्यालयात अक्षरश: झुंबड उडणार आहे. माघारीसाठी एकच दिवस असल्याने राजकीय पक्षांची चांगलीच गोची झाली आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू असून त्यामध्ये काहींना यश, तर काही दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत. माघारीसाठी सर्व प्रकारची आयुधे वापरली जात आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी १ ते ६ फेबु्रवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ७ फेबु्रवारीला छाननी झाल्यानंतर माघारीची तारीख सहा दिवसांनी ठेवली. गेले आठ दिवस इच्छुकांची मनधरणी सुरू आहे. विविध आमिषे दाखवून बंड थंड करण्याचा सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सहकारी संस्थेत संधी देण्याचे आश्वासन देण्याचा स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहे, पण ते बंड शमले नाही, तर थेट जिल्हा पातळीवरील नेत्यांकडूनही मनधरणी केली जात आहे. येनकेनप्रकारे आपल्या विजयाच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. जिथे नात्यातील बंडखोरीची शक्यता आहे, तिथे माघारीसाठी पै-पाहुण्यांची फौजही काम करत आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन या चार तासातच माघार घ्यावी लागणार आहे. कालावधी फारच कमी असल्याने प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी केली आहे. हजारे, आंग्रे, भूषण पाटील यांच्याकडे लक्षराष्ट्रवादी कॉँग्रेसचे बाबूराव हजारे यांनी परिते, शिवसेनेचे भूषण पाटील यांनी बोरवडे, तर अस्मिता आंग्रे यांनी खुपिरे पंचायत समिती मतदारसंघातून बंडखोरीची तयारी केली आहे. त्याशिवाय सर्जेराव मोळे (कळे), सचिन चौगले (वडणगे) यांनी दंड थोपटले असून, पक्षीय पातळीवरून त्यांना शांत करण्यासाठी जोरदार व्यूहरचना लावली आहे. त्यामुळे हे इच्छुक आज काय भूमिका घेणार, याकडे नजरा लागल्या आहेत. यंत्रणेची कसरतजिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अडीच हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. माघारीसाठी केवळ चार तास वेळ असल्याने गर्दी उसळणार आहे. राजकीय पक्षांसह निवडणूक यंत्रणेलाही कसरत करावी लागणार आहे.
अर्ज माघारीसाठी आज उडणार झुंबड
By admin | Published: February 13, 2017 12:41 AM