लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरात ज्या औषध दुकानदारांचे नुकसान झाले आहे. त्यांना पुन्हा आर्थिक मदतीसह साहित्य देऊन पुन्हा त्यांचा व्यवसाय उभा करून दिला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांनी दिले. ते रविवारी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झालेल्या औषध दुकानदारांची पाहणी करण्याकरिता आले होते. यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.आमदार शिंदे म्हणाले, ‘जिल्ह्यात एकूण १८० औषध दुकाने पुरामुळे बाधित झाली होती. आतापर्यंत १४३ दुकानदारांना मदतीचा हात दिला आहे; यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील व अध्यक्ष संजय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे २०० हून अधिक सभासद पुराच्या काळात स्थलांतरित छावणीत होते. त्यांच्याकरिता २४ तास लागेल ती औषधे पुरविण्याचे ते काम करीत होते. यात तीन हजार पोलीस, जवान, एनडीआरएफचे जवान, स्वयंसेवी संस्थांना लेप्टोस्पायरोसीस, डेंग्यू, फंगल इन्फेक्शन, आदी रोगांपासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचे किटही वाटप केले.यावेळी राज्य असोसिएशनचे संघटक सचिव मदन पाटील, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बेलकर, सांगलीचे केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष विजय पाटील, पदाधिकारी दिलीप कदम, शशिकांत खोत, बच्चु भाई, सुधीर खराडे, रमेश छाबडा, प्रकाश शिंदे, सचिन पाटील, सुशील शहा, दत्तप्रसाद टोपे, अनिल नावंदरे, दाजीबा पाटील, डी. एम. पाटील, सरदार पाटील, भुजंगराव भांडवले, प्रल्हाद खवरे व माजी पोलीस उपअधीक्षक मोहन माने उपस्थित होते.--------असोसिएशनतर्फे मदतीचा हात असा- भिजलेला औषधी माल उत्पादक कंपन्यांकडून बदलून दिला जाणार. त्यासंबंधी कंपन्यांची बोलणी सुरू.- पूरबाधित औषध दुकानदारांना घाऊक औषध व्यापारी एक ते दोन महिन्यांचा माल उधारीवर देणार.- १५ हजार किमतीचा फ्रीज, ३0 हजार किमतीचा संगणक मोफत देणार- ज्यांचे दुकान पूर्णत: पडले आहे. अशांना पतपेढीच्या माध्यमातून कर्ज देऊन त्यातील ५० टक्के रक्कम असोसिएशन भरणार. उर्वरित रक्कम दुकानदार फेडणार.- दहा बाय दहाचे स्टील फर्निचरकरिता दोन लाखांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणार. त्यापैकी एक लाख असोसिएशन भरणार.- राज्यातील ७0 हजार केमिस्ट सभासदांकडून कोल्हापूरसाठी पाच, तर सांगलीसाठी सात कोटी ५० लाख अशी साडेबारा कोटींची मदत पूरग्रस्त औषध दुकानदारांना देणार. उर्वरित जमलेला निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार.----------एक फोन आणि यंत्रणा कार्यान्वितमाजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या मागणीनुसार एक ट्रक औषधे कोल्हापूर, सांगलीला पाठवून दिली. त्यानंतर एक तासाने राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार दोन ट्रक औषधे रवाना केली. अजूनही दोन्ही ठिकाणच्या जिल्हा असोसिएशनच्या हॉलमध्ये पूरग्रस्तांसाठी औषधे मोफत दिली जात आहेत, अशी एकूण तीन कोटी रुपयांची औषधे राज्य असोसिएशनतर्फे मोफत पुरविण्यात आली.-------