कोपार्डे : जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या प्रलंयकारी महापुराने करवीर तालुक्यातील शेती व नागरी वस्तीसह व्यावसायिक दुकानांचीही मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. तालुक्यातील शेती व नागरी वस्तीत पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून शेतीचे साडेतेरा कोटी तर पडझड व नागरी वस्तीत पाणी शिरल्याने साडेसहा कोटी असे २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज या पंचनाम्यातून प्राथमिक अंदाज समोर आला आहे.
जून महिन्यात पावसाने दमदार सुरुवात केल्याने या वर्षी भात,भुईमुग,सोयाबीन पिकांची उगवण व वाढ जोमात सुरु होती. पण जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात ढगफुटीसदृश पावसाने करवीर तालुक्यातील अनेक गावांना बेटाचे स्वरूप आले होते. करवीर तालुक्यातून वाहणाऱ्या पाच नद्यांनी २०१९च्या महापुराची १० फुटाने रेषा ओलांडली होती. शेतीबरोबर नागरी वस्तीत पाणी शिरल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. करवीर तहसीलदार, कृषी विभाग व पंचायत समितीच्या संयुक्त नुकसानीचे पंचनामे आता पूर्ण झाले आहेत. यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. करवीर तालुक्यातील लागवड योग्य ४२ हजार १७० हेक्टर क्षेत्रापैकी २३ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड आहे. तर भात ५ हजार ९००हेक्टर, भुईमूग ४ हजार ४०० हेक्टर, तर सोयाबीन ४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर आहे. तर ४४७ हेक्टर क्षेत्रावर इतर पीके आहेत. यातील पुरामुळे ऊसाच्या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून याचा फटका ३९ हजार २३४ शेतकऱ्यांना बसला आहे. १० हजार २२८ हेक्टरवरील ऊस व भात पीकांचे महापुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले असून १३ कोटी ७२ लाख रूपयांचे शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच नागरी वस्तीत पाणी शिरल्याने पडझड, प्रापंचिक साहित्याबरोबर पशुधनाचेही नुकसान झाले आहे. करवीर तालुक्यात २५ हजार ६०० कुटुंबे पूरग्रस्त आहेत. यातील १० हजार ७१२ कुटुंबांना ५ कोटी ३९ लाख ६० हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. आणखी १४ हजार ८०८ कुटुंबाना १ कोटी ५ लाख अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.