* पंचनाम्यावेळी तंटे सुरू
उदगाव:
महापूर ओसरायला सुरुवात झाली आहे.२०१९ पेक्षा हा पूर विध्वंसक जरी नसला तरी गावेच्या गावे चहूबाजूने वेढल्याने पूर्णतः गावे स्थलांतर झालेली होती. परंतु किमान दोन दिवस घरात पाणी असावे अशी अट सानुग्रह अनुदानासाठी घातल्याने सगळीकडून पाणी वेढलेल्या पूरग्रस्तानी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१९ ची पूररेषा पकडून आम्ही बाहेर पडलो ही आमची चूक झाली काय? असा प्रश्न पंचनाम्यावेळी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरिक विचारत आहेत.
शिरोळ तालुक्यातील बेचाळीस गावांना महापुरामुळं धोका पोहोचतो. गेल्या महापुरावेळी मोठा महाप्रलय आल्याने तो सावधगिरीचा इशारा बाळगत गाव पुढाऱ्यांनी सर्वांना बाहेर काढले. त्यांची होईल तशी व्यवस्था केली. परंतु उंबऱ्याला पाणी लागले तरी पंचनाम्यात सानुग्रह अनुदानाला खाट मारण्याचे काम महसूल व ग्रामपंचायत विभागाकडून सुरू आहे. जर पूर्ण गाव बाधित असेल तर सर्वांनाच दहा हजारांचे सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे, अशी मागणी ही लोकप्रतिनिधीना पूरग्रस्त गावांनी केली आहे.परंतु पंचनामे संपत आले तरी त्यावर निर्णय होत नसल्याने वारंवार वाद उफाळत आहेत.
चिंचवाड ता. शिरोळ येथील सरपंच ज्योती काटकर यांच्यासह सदस्यांनी सर्वांना सानुग्रह अनुदान मिळावे याचा ठराव केला आहे. तेथील ४२०कुटुंबे स्थलांतरित झाली होती. महसूल विभागाच्या धोरणानुसार त्यापैकी फक्त १२० कुटुंबाना लाभ मिळणार आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण तालुक्यातील पूरग्रस्ताची आहे. याच मागणीसाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन जाचक अटी बदलाव्यात व सर्वांना अनुदान मिळावे यासाठी भेट घेणार आहेत.
---------
ग्रामपंचायतचा ठराव करून आम्ही शासनाला तातडीने म्हणणे मांडणार आहे.
अनुदान नाही मिळाले तर सर्व पूरग्रस्त तहसील कार्यालयाला समोर ठिय्या मारतील.
ज्योती काटकर,सरपंच,चिंचवाड
----
फोटो ओळ- उदगाव ता. शिरोळ येथे पूरग्रस्ताचे पंचनामे करताना तलाठी सचिन चांदणे,ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, जालिंदर बंडगर,मोहन भंडारे,कर्मचारी व पूरग्रस्त
छाया- अजित चौगुले, उदगाव