कोल्हापूर : करवीर तालुक्यातील आंबेवाडी, प्रयाग चिखली या गावात पाणी घुसू लागले असून बुधवारी बहुतांशी कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. उर्वरित पाण्याचा अंदाज बघून हलणार असून आंबेवाडी येथील भाडेकरू आपल्या पाहुण्यांच्या घरी गेले आहेत. तर जनावरे सोनतळीतील छावणीत दाखल झाले आहेत.बुधवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले आहे. त्यात ‘वारणा’ धरणातून विसर्ग वाढल्याने वारणा नदीची तुंबी पंचगंगेला आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. सकाळपासूनच पुराच्या पाण्याने चिखली व आंबेवाडी गावाला वेढा देण्यास सुरुवात केली होती. दुपारनंतर पाण्याची तीव्रता वाढत गेली आणि नागरिकांची धावाधाव सुरू झाली. करवीर पोलिस ठाणे व करवीर तहसीलदार कार्यालयाने नागरिकांना सक्तीने स्थलांतर करण्यास सुरुवात केली. काही कुटुंबे आपल्या घराच्या दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर राहिली आहेत. पाण्याची तीव्रता पाहून त्यांनाही स्थलांतरित केले जाणार आहे.कोणत्याही क्षणी रेडे डाेह फुटणारकोल्हापूर ते मलकापूर मार्गावर शिवाजी पुलाच्या पुढे पुराचे पाणी रस्त्याच्या कडेला आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काठोकाठ पाणी आले असून कोणत्याही क्षणी पाणी रस्त्यावर येऊ शकते. येथे पाणी आल्यानंतर ‘रेडे डोह’ फुटला असे म्हणतात. मगच पंचगंगेला महापूर आला असे मानले जाते.
घर सोडताना कडा पाणवल्या..आपले हक्काचे घर सोडून बाहेर जाताना अनेक नागरिकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. पुरामुळे किती दिवस बाहेर रहावे लागणार? या चिंतेची छटा नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
आंबेवाडी येथील ६५ कुटुंबे जैन मंदिर, अभिषेक लॉन येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. पुराच्या पाण्याकडे प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणा लावली आहे. - सुनंदा मारुती पाटील (सरपंच, आंबेवाडी)