रमेश पाटील
कसबा बावडा (कोल्हापूर): गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे कसबा बावडा -शिये रोडवर सायंकाळी सातच्या सुमारास पाणी येण्यास सुरुवात झाली. मात्र सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला नाही.राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ३९ फूट आहे. तर धोका पातळी ४३ फूट आहे. सध्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. मात्र, पंचगंगा धोका पातळीकडे सरकते तेव्हाच बावडा -शिये रस्त्यावर हळूहळू पाणी येण्यास सुरुवात होते. जेव्हा इशारा पातळी ४२ फुटावर जाते. तेव्हा या मार्गावर दोन फूट इतकी पाणी वाढून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होतो.दरम्यान आज, दिवसभरात पावसाने उघडीप दिली असली तरी राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यास हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो. एकदा हा मार्ग पाण्याखाली गेल्यास औद्योगिक वसाहतीकडे कामानिमित्य ये-जा करणाऱ्या लोकांना व राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या वाहनधारकांना शिरोली पुलावरून ये-जा करावी लागते.