सतीश पाटील शिरोली : गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरोली येथे पुणे-बंगळूरु महामार्गा लगत पश्चिम बाजुस असलेल्या सेवा मार्गावर आज, सकाळी महापुराचे पाणी आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास महामार्गावर पाणी येऊ शकते. सन २०१९ ला ८ दिवस तर २०२१ ला चार दिवस महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग बंद होता.सध्या पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. आज, मंगळवारी सकाळी ११ पंचगंगेची पातळी ४०.५ फुट इतकी होती. यातच महामार्गाच्या पश्चिम बाजूस असलेल्या सेवा मार्गावर २ फुट पाणी आले आहे. पंचगंगा पाणी पातळी ४९ फुटांवर गेली की महामार्गावर पाणी यायला सुरुवात होते.राधानगरी धरण ९४ टक्के तर दुधगंगा काळम्मावाडी धरण ५२ टक्के भरले आहे. राधानगरी धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरल्यास धरणाचे दरवाजे एक दोन दिवसांत उघडले जाण्याची शक्यता आहे. धरणाचे दरवाजे उघडल्यास पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होवून महामार्गावर पाणी येण्याची शक्यता आहे.
Kolhapur: पुणे-बंगळूरु महामार्गालगत शिरोली येथे सेवा मार्गावर पुराचे पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:15 PM