गेल्या तीन दिवसांपासून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर व बालिंगा पंपिंग स्टेशनलाही बसला. हे पंपिंग स्टेशन गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकले आहे. त्यात मोठ्या क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटारही पाण्यात बुडाल्या आहेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. शहरातील ए, बी, सी, डी, ई या सर्व वाॅर्डांसह उपनगरातही पाणी नसल्याने सर्वत्र पाणीबाणी आहे. घरातील उपलब्ध साठा संपल्यानंतर अनेकांनी कूपनलिकांचा आधार घेतला, तर जेथे पाण्याची काहीच सोय नाही, अशा नागरिकांनी एकत्र येत ५००० ते १२५०० लिटर क्षमतेचे प्रति टँकर १ हजार ते १५०० रुपये दराने मागविले. ही बाब महापालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी जाणून आपल्या प्रभागात लागतील तेवढे पाण्याचे टँकर पुरविले. त्यामुळे तहानलेल्या नागरिकांची चांगली सोय झाली. महापालिकेसह खासगी टँकर शहरातील सर्व प्रभागांत दिवसभर कार्यरत होते.
एका टँकरला पाच हजार रुपये
अनेक इच्छुकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांची पाण्याची सोय व्हावी याकरिता दिवसभराच्या पाच हजार रुपये प्रति टँकर बोलीवर ५ ते साडेबारा हजार लिटर क्षमतेचे टँकर भाड्याने घेतले होते. यात लागेल तेवढे डिझेल घालण्याची अट टँकर मालकांनी घातली होती. दिवसभरात कळंबा फिल्टर हाऊस, बावडा फिल्टर हाऊस आणि शिवाजी विद्यापीठ या तिन्ही ठिकाणाहून टँकरद्वारे आपल्या प्रभागात पाणीपुरवठा केला जात होता. विशेष म्हणजे टँकरच्या दोन्ही बाजूला इच्छुकांनी आपल्या नावाचे जाहिरात फलकही लावले होते. शहरात २५० हून अधिक असे खासगी टँकर कार्यरत होते.