कोल्हापूर : अतिवृष्टी व संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरात मोठया प्रमाणात महापूर आला असून, पाणी आलेल्या पूरग्रस्त भागात महत्तम पूरपातळी निश्चित करण्यासाठी मार्किंग करण्याच्या सूचना महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नगररचना विभागास दिल्या.
शहरात २०१९ मध्ये असाच मोठा महापूर आला होता. यावेळी नगररचना विभागाकडून पूर आलेल्या सर्व भागांत पूररेषेचे मार्किंग केले होते. आताही मोठया प्रमाणात शहरात महापूर आला आहे. त्यामुळे पूररेषेची महत्तम पातळी निश्चित करण्याकरिता मार्किंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्याप्रमाणे पुराचे पाणी आलेल्या ठिकाणी पाण्याच्या लेव्हलचे मार्किंग करण्याचे काम शनिवारी सुरू करण्यात आले आहे. यासाठी नगररचना विभागाचे उप-शहर रचनाकार रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता, सर्व्हेअर व विभागीय कार्यालयाकडील आवश्यक कर्मचारी घेऊन मार्किंग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.