कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागाच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्डातील सर्व मूल्यमापन (असेसमेंट) लिपीक व प्रभारी अधीक्षक आदी सर्व कर्मचाऱ्यांची बुधवारी दिवसभर झाडाझडती झाली. पहिल्या टप्प्यांत उपआयुक्त अश्विनी वाघमळे व त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी कसून चौकशी केली. ‘एचसीएल’ कंपनीने कोऱ्या पावत्यांबाबतचा अहवाल सादर केला असून याची पडताळणी केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगीतले. शहरातील किमान दीड हजारांहून अधिक मिळकतधारकांना गेली अनेक वर्षे कोऱ्या पावत्या (बिले) पाठविली जात आहेत. या सर्व प्रकाराबाबत ‘एससीएल’ या ई-गर्व्हनन्स ठेकेदाराने अहवाल सादर केला. या अहवालाची मनपाच्या मूळ कागदपत्रांशी पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे नेमकी कोणाची चूक आहे? अशी चूक होऊ नये, यासाठी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे? याची पडताळणी केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.शहरातील सर्व मिळकतींचे त्रयस्थ संस्थेमार्फत पडताळणी करण्यासाठी येत्या आठ दिवसांत निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. सर्व मिळकतींच्या नव्याने मोजमापांसह व्यापारी, रहिवासी व औद्योगिक अशी वर्गवारी केली जाईल. ही सर्व माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मिळकतधारकांस नेमका किती घरफाळा आकारणी झाला, हे पाहता येणार आहे. तुलनात्मकदृष्ट्या इतर मिळकतींची माहिती उपलब्ध होईल तसेच दिलेल्या तारखेनंतर घरफाळा भरल्यास किती दंडव्याजाची रक्कम होईल, हे नमूद असेल. लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. (प्रतिनिधी)
घरफाळा विभागाची झाडाझडती
By admin | Published: April 23, 2015 1:02 AM