विश्वास पाटील ।कोल्हापूर : कृष्णा नदीतील पाणीवाटपामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशने जरूर वाद घालावा; परंतु महापुरामध्ये राष्ट्रीय आपत्ती म्हणून सामोरे गेलो तरच महापुराच्या संकटाची तीव्रता आपल्याला कमी करता येईल. त्यासाठी ‘रिअल टाईम फ्लड फोरकास्ंिटग’ यंत्रणा विकसित करावी, असे भीमा-कृष्णा खोरे महापूर अभ्यास समितीने सुचविले आहे. समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केलेल्या सर्व सूचनांची दखल या अहवालात घेतली आहे. त्यांनी समितीतून बाहेर पडून अहवाल आधीच फोडला हे चुकीचेच आहे; परंतु मला त्याबद्दल काहीच म्हणायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वडनेरे म्हणाले, तिन्ही राज्यांनी पाण्यावरील आपापले हक्क जरूर सांगावेत, पाणी वापरासाठी जरूर भांडा; परंतु तिथे विध्वसंक पूर येतो तेव्हा ती राष्ट्रीय आपत्ती म्हणून आपण सामोरे गेले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडे एकच यंत्रणा असली पाहिजे आणि ती रिअल टाईम फ्लड फोरकास्टिंग यंत्रणा होय. हे धोरण तिन्ही राज्यांनी मान्य केले आहे. महाराष्ट्राच्यावतीने त्यासंबंधीच्या लवादामध्ये हा मुद्दा मांडला आणि तो जलविवाद कायद्यान्वये (वॉटर डिस्प्युट अॅक्ट) मंजूर केला आहे. त्यानुसार यापुढे कार्यवाही होईल.
वडनेरे म्हणाले, महापूर रोखण्यासाठी जलाशय परिचालन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. धरणांचा वापर पाणी साठविण्यासाठीच केला जातो. हे त्याचे महत्त्वाचे काम आहेच, परंतु त्यांचा उपयोग पूर विरोधक म्हणूनही कसा करून घेता येईल, असा विचार केला आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील धरणांमध्ये पूर सामावून घेण्याची क्षमता निर्माण केलेली नाही. कारण ते केले असते तर धरणाची उंची वाढते व त्याचा खर्चही वाढतो. जी आपल्याला उत्तर प्रदेशात पाहायला मिळते.
पावसाळा सुरू होताना धरणांत किती पाणी ठेवायचे याच्या अचूक नियोजनावर भर दिला जाणार आहे. कोणत्या महिन्यांत धरणांत किती पाणी ठेवायचे असे मागील वर्षाच्या पुरावर आधारित केलेले नियोजन अंदाज चुकवू शकते. आपण धरणांतील पाणी सोडून दिले आणि पूर आलाच नाही तर टांगती तलवार राहते. पाणी साठवून ठेवले आणि जास्त पाऊस होऊन पूर आला तर धरणे महापूर आणण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून या सर्वांवरील उत्तर म्हणून आपल्याला पूर कधी येणार याचे अंदाज त्या-त्या वेळीच मिळतील, अशी व्यवस्था उभी करा. किती पाण्याचा लोंढा केव्हा येतो हे आताच समजले पाहिजे. त्यासाठी ‘रिअल टाईम डिजिटल फ्लड फोरकास्टिंग’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. स्वयंचलित रेनगेज स्टेशन आपण धरणाच्या सर्व क्षेत्रांवर लावली आहेत. त्याचे खालच्या बाजूला मीटरिंग केले आहे. त्या दोघांची कनेक्टिव्हिटी करून सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
सॅटेलाईटचे मेसेजेस वापरून धरणांत किती पाणी आहे व पाण्याची लाट कुठपर्यंत कशी येत आहे हे समजले पाहिजे. ठरावीक कॅचमेंट एरियामधील पाण्याचा अंदाज बांधता येतो. त्यातून कोयनेमध्ये इतका पाऊस पडला तर त्याची एवढी लाट तयार होऊन इतक्या क्षेत्रात पाणी येईल हे समजू शकते. अशी मॉडेल्स कोल्हापूर आणि सांगलीतील प्रत्येक धरणामध्ये करण्यात येणार आहेत; परंतु सध्या त्यांचे काम प्राथमिक स्तरांवर आहे. मोठा पूर आला की वापरलेली साधने वाहून जातात. त्यामुळे डेटा मिळत नाही. त्यामुळे हीच यंत्रणा जास्त कशी सक्षम करता येईल यावर भर दिला आहे.
पूर संस्कृती..पुराचीही एक संस्कृती असते. पूर्वीच्या काळी पूर आला की लोक डोक्यावर साहित्य घेऊन चालू लागायचे. मागे काही त्यांचे उरायचे नाही. परत येऊन परत वस्ती करायचे. तसे आज होत नाही; कारण घर सोडण्याची मानसिकता नसते. गेल्या वर्षी अनेक गावांत हे चित्र दिसले.
रेल्वेगाडी आणि पूरआपण रेल्वेस्थानकावर थांबलेलो असतो आणि रेल्वे सुरुवातीला १५ मिनिटे उशिरा धावणार आहे असे सांगितले जाते. त्यानंतर पुन्हा ती तासभर उशिरा धावणार आहे असे सांगितले जाते, असेच काहीसे धरणांतील पाणी सोडण्याबाबत घडते. परंतु तसे घडू नये यासाठीच अचूक नियोजन आवश्यक आहे