कोल्हापूर : यंदाच्या महापुराची झळ जिल्ह्यातील ४११ गावांना बसली आहे. जरी या गावांमधील पाणी ओसरले असले तरीही तेथे काही ना काही नुकसान झाले असून, पंचनाम्यांनाही सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही काेल्हापूर-रत्नागिरी मार्ग मात्र वाहतुकीसाठी बंदच आहे. अनेक गावांतील पूरग्रस्त आपल्या घरी परतत असल्याचे चित्र आहे.
पूर ओसरल्यानंतर आता कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही स्वच्छतेचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले. त्यामुळे आता मुंबई, नवी मुंबई आणि पुणे महापालिकेने यासाठी सहकार्याचा हात पुढे केला असून, टँकर व अन्य यंत्रणा कोल्हापुरात दाखल झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यासह शहराचा दौरा करून शासकीय यंत्रणेला पाठबळ दिले.
चार दिवसांपूर्वी आलेला पूर आता ओसरला असून, शहरातील प्रमुख बंद झालेले रस्ते सुरू झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला असून, अजूनही रत्नागिरी रस्ता बंदच आहे. ५६.३ फुटांवर गेलेली राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी आता ४५.६ फुटांवर आली आहे. ४३ फूट ही धोका पातळी आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक गावांभोवती अजूनही पाणी असले तरी पातळी घटत असल्याचे चित्र आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्यानंतर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूरग्रस्तांसाठी कोणत्या योजना जाहीर होतात याकडे आता पूरग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पवार यांनी सार्वजनिक बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पुण्याहून पाचारण केले होते; तर पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांशीही त्यांनी मंगळवारच्या दौऱ्यात चर्चा केली आहे.
चौकट
आतापर्यंत स्थलांतरित कुटुंबे ३६,६१५
स्थलांतरित लोकसंख्या १,६२,५६४
पैकी नातेवाइकांकडे १,३९,४९१
निवारा कक्षामध्ये २३,०७३
स्थलांतरित जनावरे ५४,५२५
कोविड रुग्ण छावणीत २२
पूर्ण बाधित गावे ३४
अंशत: बाधित ३७७
मृत्यू ७
जनावरांची हानी ११०
वित्तहानी अंदाजे २४३ कोटी