कोल्हापूर : महापुराने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) उद्योगांची धडधड थांबली आहे. बंद असलेला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, खंडित झालेला वीजपुरवठा आणि कामगारांची अनुपस्थिती या अडचणीमुळे गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश कारखान्यातील कामे बंद आहेत.
कोरोनाच्या नियमांचे पालन करीत जिल्ह्यातील शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील कारखाने, मशिन शॉप, फौंड्री सुरू आहेत. कोरोनाच्या काळातही या औद्योगिक वसाहतींमधील कामाचे प्रमाण चांगले आहे. उद्योगचक्राची गती वाढत असतानाच गेल्या तीन दिवसांमध्ये कोल्हापुरात झालेल्या जोरदार पावसामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील या प्रमुख चार औद्योगिक वसाहतींचा पाणी आणि काहीवेळा वीजपुरवठा खंडित झाला आहे. विविध ठिकाणी पाणी असल्याने मार्ग बंद आहेत. त्यामुळे कामगारांना त्यांच्या कारखान्यामध्ये येणे शक्य झालेले नाही. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली आणि कागलपासून पुढे काही अंतरावर महापुराचे पाणी आल्याने तेथील मालवाहतूक बंद आहे. या सर्व कारणांमुळे बहुतांश उद्योगांची धडधड थांबली आहे. शिवाजी उद्यमनगरमधील ओढ्यालगतच्या काही कारखान्यांमध्ये पाणी शिरले आहे. येथील बहुतांश कारखान्यातील काम बंद आहे. पुराचे पाणी ओसरण्याकडे उद्योजक, कामगारांच्या नजरा लागल्या आहेत.
चौकट
शिरोली एमआयडीसीला शंभर कोटींचा फटका
शिरोली एमआयडीसीतील ८० टक्के उद्योग बंद आहेत. किरकोळ स्वरूपात काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गासह शहराला जोडणाऱ्या मार्गावर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद आहेत. कामगार हे आपापल्या गावांमध्ये अडकले आहेत. या स्थितीमुळे एमआयडीसीला सुमारे शंभर कोटींचा फटका बसला असल्याचे ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी रविवारी सांगितले.
प्रतिक्रिया
महापुराच्या स्थितीमुळे गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील साधारणत: ५५ टक्के उद्योग सुरू आहेत. पाणीपुरवठा बंद आहे. वीजपुरवठा काहीवेळा खंडित होत आहे. महामार्ग बंद असल्याने कच्च्या मालाची आयात आणि तयार उत्पादनांची निर्यात थांबली आहे. या एमआयडीसीला सुमारे दीडशे कोटींचा फटका बसला आहे.
-श्रीकांत पोतनीस, अध्यक्ष, गोशिमा.
महापुराचा उद्योगांना फटका बसला आहे. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील निम्म्याहून अधिक कारखाने, उद्योग बंद आहेत. उर्वरित उद्योगांतील कामाची गती मंदावली आहे.
-गोरख माळी, अध्यक्ष, मॅक
औद्योगिक वसाहतनिहाय आकडेवारी
वसाहत उद्योग कामगार
शिवाजी उद्यमनगर ८५० १००००
शिरोली १००० ३००००
गोकुळ शिरगाव ८०० १५०००
कागल-हातकणंगले ४५० ४००००