सरदार चौगुले,
लोकमत न्यूज नेटवर्क
पोर्ले तर्फ ठाणे : कमी वेळेत जादा पाऊस लागल्याने जिल्ह्यातील नद्यांनी महापुराची परिसीमा गाठली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदा आलेल्या महापुराने माती मिश्रित गाळयुक्त वाहून आणलेले पाणी बुडालेल्या पिकांना बाधित ठरल्याने नुकसानाचा टक्का वाढला आहे. महापूर लवकर ओसरला असला तरी गाळयुक्त माती पिकांच्या शेंड्यात आणि पानावर साचून राहिल्याने हळूहळू नुकसानाची तीव्रता गडद होताना दिसत आहे. ऊस पिकावर आर्थिक घडी बसवणारा शेतकरी गाळयुक्त महाराष्ट्र पुराच्या धोक्याने आर्थिकदृष्ट्या चांगला घसरला आहे.
आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पूर ओसरण्यासाठी केलेला प्रयत्न सकारात्मक असला तरी पीक नुकसानाचे चित्र भयावह आहे. पुराच्या पाण्यात कुजलेल्या उसाची उन्हाच्या तीव्रतेने खोडवी होते. नदीकाठच्या पिकांचा नुकसानाने रंग बदलेला असतानासुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळविण्यासाठी आणि सवलतीच्या योजनांसाठी झगडावे लागते. हीच बळीराजाच्या वाट्याला आलेली मोठी शोकांतिका आहे.
प्रत्येक पावसाळ्यात जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात नदीला एक-दोन पूर येऊन जात असल्याचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. पहिल्या पुरादरम्यान वाहून आलेली माती मिश्रीत गाळ पाण्याच्या प्रवाहात निघून गेल्यामुळे त्यानंतर येणाऱ्या मोठ्या पुरात पिकांची हानी होत नाही. त्यामुळे पीक नुकसानाचे प्रमाण कमी असते; परंतु यंदा सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे लहानसहान येणारे पूर आले नाही, त्यामुळे माती मिश्रीत गाळ आणि केपटा वाहून गेला नाही. अतिवृष्टी आणि कमी वेळेत जादा पाऊस लागल्यामुळे नद्यांचे पाणी झपाट्याने वाढले. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे डोंगरमाथ्यावरील माती वाहून आल्यामुळे, माती मिश्रीत गाळाचे प्रमाण वाढले. बुड क्षेत्रात सर्वत्र गाळयुक्त पाणी पसरल्याने पूर ओसरेल तसा गाळ उसाच्या शेंड्यात आणि पानावर साचून राहिला. परिणामी, ऊसाचा शेंडा कुजला आहे, तर पाने करपून गेली आहेत. याचा उसाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात कमालीची घट होणार आहे. काबाडकष्ट आणि भरमसाठ उत्पादन खर्च करून वाढविलेले ऊस पीक महापुराच्या संकटाने वाया गेल्याने त्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या आकडेवारी आणि तारखेकडे लक्ष लावून आहे.
प्रतिक्रिया
प्रत्येक वर्षी मोठ्या पुराच्या अगोदर लहानसहान एक-दोन पूर आल्यामुळे नदीकाठचे कमी क्षेत्र पाण्याखाली जाते, त्यामुळे नुकसानाचे प्रमाण कमी असते. यावर्षीची परिस्थिती गंभीर होती. पहिलाच माती मिश्रीत गाळयुक्त महापूर आल्याने ऊस पिकासाठी बाधिकार ठरला आहे.
पूर लवकर ओसरूनही २०१९ पेक्षा नुकसानाचा टक्का जादा आहे. त्यामुळे शासनाने १०० टक्के नुकसान गृहित धरून नुकसान भरपाई त्वरित द्यावी.
रामराव चेचर, पन्हाळा तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
चौकट
पूर बाधित क्षेत्रात माती मिश्रीत गाळ ऊसाच्या शेंडा गेल्याने तो कुजून बाहेर पडतो. पानावर गाळ साचल्याने अन्नद्रव्य निर्मितीसाठी उपयुक्त असलेली सूर्य संश्लेषण प्रक्रिया थांबते. परिणामी,उसाची वाढ थांबते. शेंडा कुजल्यामुळे खालच्या उसाला फुटवे सुटतात. सुटलेले फुटवे उसातील अन्न रस शोषून घेतल्यामुळे जिवंत असलेला उसाचा बुडका पोकळ होतो. त्याचा परिणाम उसाच्या वाढीवर झाल्याने उत्पादनात कमालीची घट येते.