पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास पुष्प पठारावर गुरुवारी रात्रीच्या व शुक्रवारी दुपारच्या जोरदार पावसामुळे फुलांचा हंगाम आणखी २० ते २५ दिवसांनी वाढला आहे. यामुळे वरुणराजाने पर्यटकांना ही फुलांची पर्वणी पाहण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. दरम्यान, या पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा आकडा लाखोंच्या घरात येऊन पोहोचला आहे. तसेच पठारावर वाहनांची रीघ पाहता जणू काही कास पठार ‘कार पठार’ बनले आहे. फ्रान्स, जर्मनी, जपानसारख्या परदेशी पर्यटकांनी कास पुष्प पठाराला भेट देऊन जैवविविधतेचे कौतुक केले आहे.जिल्ह्यातील कास पुष्प पठार हे आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणारे मुख्य पर्यटनस्थळ ओळखले जात असून, सध्या अबोलिया, तेरडा, चवर या फुलांचा हंगाम कमी झाला असून, इतर फुले चांगल्या प्रकारे बहरलेली दिसून येत आहे. यामध्ये मिकी माऊस, टोपली, कारवी प्रामुख्याने पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे महिनाभर हंगाम पाहण्याची पर्वणी पर्यटकांना मिळणार आहे. तसेच वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी वनविभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, पोलीस यंत्रणा सज्ज होती. तसेच वाहनांची गर्दी होऊन वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी गेल्या आठवड्यापासून मोठी वाहने पार्क करण्यासाठी घाटाई फाट्यावर वाहनतळाची व्यवस्था केली आहे. (वार्ताहर)दोन दिवस झालेल्या पावसामुळे पुष्प पठारावरील विविधरंगी फुलांची पर्वणी पर्यटकांना अजून महिनाभर पाहावयास मिळणार आहे. तसेच रस्त्यालगत तेरड्याचा बहर कमी झाला असून, कुमुदिनी कमळे व कुमुदिनी तळ्याच्या राजमार्गावर तेरड्याचा बहर दिसत आहे. पावसामुळे फुले टवटवीत दिसून येत आहेत. - अशोक कुरळे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, कासाणीसात वर्षांतून एकदाच पर्वणीटोपलीसारखा आकार असणारा प्लिओकोलस रिची (टोपली कारवी) सध्या कास पुष्प पठारावर पन्नास टक्के फुलली असून, हिचे वैशिष्ट्ये ही सात वर्षांतून एकदाच फुलते. पानावर बारीक काटे असल्याने पानांना ‘खरवर’ म्हणतात.पर्यावरण संतुलन तसेच प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देत फर्स्ट क्लिक टेक्नॉलॉजीमार्फत दोन हजार कापडी बॅग पर्यटकांना देण्यात आल्या. यातून पर्यटकांना आपला होणारा सुका कचरा बॅगमधून घरी आणणे सोयीचे व्हावे, तसेच पर्यावरण समतोल राखला जावा हा हेतू आहे, अशी माहिती अझीम मोमीन यांनी दिली.पठारावरील गोळा झालेला दहा पोती कचरा पर्यटनास आलेले पुण्याचे पर्यटक जयेश परांजपे व त्याच्या ५० सहकारी यांनी आपल्या वाहनातून पुण्याला त्याचे निर्मूलन करण्यासाठी नेला. गतवर्षीही त्यांनी हा उपक्रम राबविला होता.
परतीच्या पावसाने पुष्प पठार पुन्हा बहरले!
By admin | Published: October 04, 2015 9:46 PM